सहा दिवसांपासून गोव्याच्या वेशीवर रखडलेल्या मान्सूनचे राज्यात शनिवार ४ जूनला आगमन होईल अशी शक्यता भारतीय वेधशाळेने वर्तवली होती, परंतु राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. मान्सूनच्या वाटचालीसाठी वा-यांची दिशाच नैऋत्येकडे वळत नसल्याने आता १२ तारखेनंतरच राज्यात दक्षिण कोकणाच्या मार्गातून वरुणराजाचा प्रवेश होईल, असा अंदाज हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी व्यक्त केला.
( हेही वाचा : संजना घाडी, सिध्देश पाटेकर, ऋषीकेश ब्रीदला संधी; ओझांना सरकावे लागणार बाजूला)
मान्सूनला १२ जून नंतरची तारीख उजाडेल
मूळात कर्नाटक राज्यातील कारवारजवळ नैऋत्य मोसमी वारे सध्या दिसत नाहीत. कारवारचे वातावरण संपूर्ण ढगाळ नाही, शिवाय वा-यांची दिशाही नैऋत्य भागाकडून नाही आहे. त्यामुळे कारवारपर्यंत नैऋत्य मोसमी वारे पोहोचलेच नसल्याचा दावा अभिजीत मोडक यांनी केला. बुधवारी ८ जूनला उत्तर केरळ ते कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती (कमी दाबाचा प्रकार) निर्माण होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. या स्थितीतील बाष्प मान्सूनला पुढे सरकण्यास मदत करते. यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल सुरु होईल. मान्सूनला १२ जून नंतरची तारीख उजाडेल, असेही मोडक म्हणाले.
मुंबईत विलंबाने ?
गेल्या आठवड्याभरापासून मुंबईत पावसाचे चिन्ह नाही. नैऋत्य मोसमी वा-याअगोदर वातावरणात दिसून येणारे बदल अद्याप मुंबईत झालेले नाहीत. नैऋत्य मोसमी वा-याअगोदर वळव्याचा पाऊस पडतो. मुंबईत वळ्याच्या पावसालाही सुरुवात झालेली नाही. तूर्तास मान्सूनच्या मुंबईतील आगमनाला विलंब होणार असल्याचे खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले.