रेल्वेला भारतीयांची लाईफलाइन असे म्हटले जाते. जगातील चौथे आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे भारतात आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या धावतात. काही ठिकाणी प्रवास करण्यासाठी तब्बल ८० तासांचा वेळ लागतो. जाणून घेऊया भारतातील सर्वाधिक लांबीच्या रेल्वे प्रवासाबद्दल…
( हेही वाचा : मुंबई पोलिसांसाठी आयुक्तांनी घेतला ‘BEST’ निर्णय!)
विवेक एक्सप्रेस ( दिब्रुगढ ते कन्याकुमारी )
आसाममधील दिब्रुगढ ते कन्याकुमारी जाणाऱ्या विवेक एक्सप्रेसचा मार्ग सर्वात मोठा आहे. विवेक एक्सप्रेस ही ३० हून अधिक स्थानकांवर थांबते आणि ४ हजार २७३ किलोमीटरचा प्रवास करते. या गाडीचा प्रवास ८० तासांचा आहे.
हमसफर एक्सप्रेस ( अगरताळा ते बंगळुरू )
हमसफर एक्सप्रेस एकूण ३ हजार ५७० किलोमीटरचा प्रवास करते. ही एक्सप्रेस आठवड्यातून दोन वेळा मंगळवारी आणि शनिवारी धावते. ही गाडी २८ स्थानकांवर थांबते. या गाडीला प्रवासासाठी ६४ तासांचा वेळ लागतो.
हिमसागर एक्सप्रेस ( कन्याकुमारी ते श्री माता वैष्णोदेवी कटरा)
कश्मीर ते कन्याकुमारीचा खऱ्या अर्थाने प्रवास करणारी हिमसागर रेल्वे १२ राज्यांमधून धावते. ही साप्ताहिक गाडी ७३ स्थानकांवर थांबते. ही गाडी ३ हजार ७८५ किलोमीटरचे अंतर ७३ तासांमध्ये कापते.
तिरुवनंतपुरम-सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस
तिरुवनंतपुरम – सिलचर सुपरफास्ट एक्सप्रेस ही साप्ताहिक गाडी ५४ स्थानतकांवर थांबते आणि ३ हजार ९३२ किलोमीटरचा प्रवास ७६ तास ३५ मिनिटांमध्ये पूर्ण करते.
अमृतसर कोचुवेली एक्सप्रेस
अमृतसर कोचुवेली एक्सप्रेस ही पंजाबमधील अमृतसर ते केरळमधील तिरुवनंतपुरमपर्यंत धावते. ही गाडी ७ राज्यांमधून जाते आणि २५ स्थानकांवर थांबते या गाडीतून प्रवासासाठी ५७ तास लागतात.
नवयुग एक्सप्रेस ( मंगलोर सेंट्रल ते जम्मू तावी)
नवयुग एक्सप्रेसला मंगलोर सेंट्रल ते जम्मू तावीपर्यंत पोहोचण्यासाठी ४ दिवस लागतात. ही गाडी ५९ स्थानकांवर थांबते आणि ४ दिवसात ३ हजार ६८५ किलोमीटरचे अंतर गाठते.