देशभरात कोरोना पुन्हा डोके वर काढत असतानाच आता पुन्हा एकदा तो राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचू लागला आहे. आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबतची माहिती दिली आहे. धक्कादायक म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी ज्या नेत्यांना भेटल्या आहेत त्यांचेही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
टेस्ट पॉझिटिव्ह
सोनिया गांधी यांना बुधवारी संध्याकाळी सौम्य स्वरुपाचा ताप आला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आता सोनिया गांधी यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना काळजी घेण्याचं आवाहन सोनिया गांधी यांनी केलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झाले असून 8 जूनपर्यंत त्या पूर्णपणे ब-या होतील, अशी माहिती सुरजेवाला यांनी दिली आहे.
ईडीकडून होणार चौकशी
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश बुधवारी दिले आहेत. 8 जून रोजी त्यांची या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. पण आता त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या चौकशीसाठी उपस्थित राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community