पावसाळ्यात मस्जिद बंदर रेल्वे स्थानकासह सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्यामुळे अनेक रेल्वे लोकल सेवा विस्कळीत होते. परंतु आता यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न महापालिकेने केला असून यासाठी पी डिमेलो मार्ग आणि यलो गेट प्रवेश मार्ग येथे मिनी पंपिंग स्टेशन तयार करण्यात येत आहे.
दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर रेल्वे स्थानक परिसरात पाणी तुंबले जात असल्याने यापूर्वी पी डिमेलो मार्ग व यलो गेट प्रवेशमार्ग येथील दरवर्षी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी १००० क्युबीक मीटर प्रति तास क्षमतेच्या पंपाची व्यवस्था केली जात होती. परंतु त्यानंतरही या भागांमध्ये एक ते दोन फूट पाणी साचले जाते. मागील वर्षी २०२१च्या पावसाळ्यात पंपाची व्यवस्था करूनही तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बराच कालावधी लागला होता. त्यामुळे याठिकाणी मिनी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
( हेही वाचा : पगार वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गुढीपाडव्याची भेट )
दोन पंपाद्वारे पाण्याचा उपसा
महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या माध्यमातून यलो गेट प्रवेश मार्ग येथे पंपांसाठी चेंबर व सम्प पीट बनवणे आणि पीटमध्ये जमा होणारे पाणी ३ हजार घनमीटर प्रती तास क्षमतेच्या दोन पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जाईल. तिथून हे पाणी ९०० मिमी व्यासाच्या आरसीसी वाहिनीतून नजिकच्या मॅनहोल्सद्वारे भूमिगत वाहिनीतून वाहून नेण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
नियंत्रण मिळवण्यास मदत
महापालिकेच्यावतीने या कामांसाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये साज एंटरप्रायझेस ही कंपनी पात्र ठरली असून यावर १३.२५ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. या कंपनीने माटुंगा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील गांधी मार्केटजवळ तुंबणाऱ्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशन बनवले आहे. या मिनी पंपिंग स्टेशनसाठी ३ हजार घनमीटर क्षमतेचे दोन पंप चार वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊन त्याचे पावसाळ्यातील कालावधीत चार वर्षांचे प्रचालन व परिरक्षण या कामांचा समावेश आहे. ही कामे झाल्यानंतर पी डिमेलो मार्ग, मस्जिद बंदर रेलवे स्थानक परिसर यो पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती बऱ्याच प्रमाणात आटोक्यात येवून त्यावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल,असे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.