स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभिनव भारत मधील जवळचे सहकारी आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये आपल्या राष्ट्रभक्तीपर कविता आणि क्रांती कार्यक्रमामध्ये प्रेरणा निर्माण करणारे कवी गोविंद त्र्यंबक दरेकर तथा स्वातंत्र्यकवी गोविंद यांच्या समग्र कवितांच्या काव्यसंग्रहाच्या पाचव्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी भगूर येथे संपन्न झाला.
पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न
कवी गोविंद त्यांच्या ९६व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच लेखिका मंजिरी मराठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जीवनगाथा संक्षिप्तरित्या पुस्तिकेत मांडली आहे. या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा देखील यावेळी भगूर येथील सावरकर स्मारकामध्ये संपन्न झाला. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर, स्मारकाचे अध्यक्ष माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, कार्यवाह राजेंद्र वराडकर, कोषाध्यक्षा मंजिरी मराठे, सदस्य शैलेंद्र चिखलकर कवी गोविंद यांच्या कविता जतन करणारे रघुनाथ महाबळ, कारगिल युद्धात अतुलनीय पराक्रम गाजविणारे माजी सैनिक नायक दिपचंद आणि सुभाष उपाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी गोविंद यांचा परिचय
गोविंद त्र्यंबक दरेकर अर्थात स्वातंत्र्यकवि गोविंद… नगर जिल्ह्यातील कण्हेरपोखरी गावचे रहिवाशी. नाशिक येथे 1899 साली स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांच्याशी कवी गोविंदांची ओळख झाली. डिसेंबर 1899 मध्ये मित्रमेळ्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेने कवी गोविंदांनी देखील मित्रमेळ्यात प्रवेश केला.
कवी ते स्वातंत्र्यकवी असा प्रवास
तो एकप्रकारे कवी गोविंदांचा पुनर्जन्मच होता. विविध मेळ्यांसाठी लावण्या लिहिणारे कवी गोविंद आता मित्रमेळ्यासाठी देशभक्तीपर गीतं लिहायला लागले. सावरकरांनी ज्यावेळी सिंहगडाचा पोवाडा, छत्रपती शिवरायांची सुप्रसिद्ध आरती रचली, त्याचवेळी कवी गोविंदांनी अफझुलखानाचा पोवाडा आणि छत्रपती शिवाजी आणि मावळे यांचा संवाद शिवजयंती निमित्त सादर केला. इथून पुढे त्यांचा स्वातंत्र्यकवी होण्याचा प्रवास सुरू झाला. त्यांनी लिहिलेल्या कविता या बनारस विश्वविद्यालयासाठी अभ्यासक्रमात होत्या.
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा
स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले
कवी गोविंदांनी मातृभूच्या स्वातंत्र्यसाठी हे गीत रचले. 1909 साली जेव्हा हे गीत आणि इतर कविता क्रांतीवीर बाबाराव सावरकरांनी प्रकाशित केल्या तेव्हा त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरण्यात आला होता.
(हेही वाचाः स्वातंत्र्यकवि गोविंद यांच्या कवितांचे सावरकर आत्मार्पण दिनी प्रकाशन)
सावरकरांचे विचार आत्मसात करणे आवश्यक- रणजित सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी यावेळी तरुणांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारकांचे कार्य महान आहे. त्यांचे विचार आणि कार्य नवीन पिढीने आत्मसात केले पाहिजे. मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी त्यांचे विचार पुढे नेणे महत्त्वाचे आहे. असे संस्कार कुटुंबामधून मुलांवर व्हायला हवेत. कोणताही भेदभाव न करता एकात्मतेच्या भावनेने सैनिक देशाची सेवा करत असतो, त्यामुळे तरुणांना सैन्य दलात जाण्याची प्रेरणा द्यावी.