साता-यात मांडूळाची विक्री रोखली

148

गोपनीय माहितीच्या आधारे सातारा वनविभागाच्या फिरत्या पथकाने बुधवारी साता-यातील शिरवड येथे विक्रीसाठी आणलेल्या जिवंत मांडूळाची तस्करी रोखली. या कारवाईत वनविभागाने तीन आरोपींना अटक केली असून, शिरवड येथेच राहणा-या रवींद्र कंगाळे (४२), मसूर येथे राहणा-या अनिकेत यादव (२४), उंब्रज येथे राहणा-या संतोष काटे (४२) या आरोपींना अटक केली.

२ किलो ३०० ग्रॅमचा मांडूळ

साता-याचे मानद वन्यजीव रक्षक आणि वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाचे सदस्य रोहन भाटे यांना अगोदर या अवैध विक्रीची माहिती मिळाली होती. मांडूळाच्या विक्रीसंदर्भातील छायाचित्र भाटे यांना मिळाल्यानंतर साता-यातील वनविभागाच्या फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला. मांडूळाच्या विक्रीसाठी वनविभागातील एका जणाला बनावट ग्राहक बनवले. सुरुवातीला व्हॉट्सअप आणि नंतर फोनवर बोलणे झाल्यानंतर विक्रीचे ठिकाण शिरवळ लोणंद मार्गाजवळील पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ ठरले. विक्रीच्या नियोजित वेळेनुसार सायंकाळी पाच वाजता हिरो होंडा पॅशन मोटरसायकलवरुन तीन जण ठरलेल्या ठिकाणी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे वनअधिका-यांनी हेरले. वनअधिका-यांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींकडून जिवंत मांडूळ हस्तगत केला. मांडूळाला कुठेही जखम झाली नसल्याची माहिती वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांनी दिली. २ किलो ३०० ग्रॅमचा १४१ सेमीचा मांडूळ वनविभागाने आरोपींच्या ताब्यातून स्वतःकडे घेतला. आरोपींची प्राथमिक चौकशी सुरु असल्याची माहिती डोंबाळे यांनी दिली.

आरोपींची चौकशी पूर्ण होणे बाकी आहे. त्यानंतर चार्जशीट तयार केली जाईल. कारवाईबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल.
– सचिन डोंबाळे, वनक्षेत्रपाल, फिरते पथक, सातारा, वनविभाग ( प्रादेशिक)

मांडूळाची विक्री अवैध

मांडूळ ही सापाची प्रजाती अनेक अंधश्रध्दांमुळे काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाते. मांडूळ ज्या ठिकाणी जमीन खणतो त्या ठिकाणी मोठा पैसा सापडतो, अशी चुकीची समजूत आजही दृढ आहे. राज्यात मांडूळाची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. मात्र वन्यसंरक्षण कायद्यात मांडूळाची विक्री करता येत नाही. वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या चौथ्या वर्गवारीत मांडूळाला संरक्षित केले आहे.

(हेही वाचा येऊरमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.