२६ जानेवारीला पुन्हा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा! टिकैत यांची घोषणा, म्हणाले…

129

भारतीय किसान युनियनने पुन्हा एकदा सरकारला अडचणीत टाकण्यास सुरुवात केली आहे. ‘भारतीय किसान युनियन’ या शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राकेश टिकैत म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही. त्यामुळे पुन्हा 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चाची काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. टिकैत म्हणाले की, सरकारचा हेतू योग्य नसून शेतकऱ्यांवर दाखल झालेले अनेक गुन्हे अजून मागे घेतलेले नाहीत. मात्र, यासंदर्भातील अंतिम शिक्कामोर्तब 15 जानेवारीला होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले टिकैत

भारतीय किसान युनिअनच्या नेत्याने सांगितले की, 15 जानेवारी रोजी संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या आणि सरकारने काय पावले उचलली याचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर 26 जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. यावेळी राकेश टिकैत म्हणाले, “सरकारचे लक्ष शेतकऱ्यांच्या जमिनीवर आहे. याबाबत काळजी घेण्याची गरज आहे. जनावरं पाळून आणि दूध विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांविरोधात सरकारचे पुढील पाऊल असणार आहे. त्यामुळे 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मोदी सरकारकडून सढळहस्ते मदत पण…)

खाप हा समाजाचा आरसा आहे आणि त्यांचा खूप अभिमानास्पद इतिहास आहे, असे टिकैत चरखी दादरीमध्ये म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, शेतकरी आंदोलनादरम्यान खाप समाजांनी संयुक्त किसान मोर्चाला पाठिंबा दिला होता. अपक्ष आमदार आणि फोगट खाप 40 चे प्रमुख सोमवीर सांगवान यांनी आयोजित केलेल्या खाप महापंचायतीत टिकैत बोलत होते.

काय आहे प्रकरण

गेल्या वर्षी 26 जानेवारी रोजी केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या निषेधार्थ 41 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने ट्रॅक्टर रॅली काढली होती. या रॅलीत शेतकऱ्यांचे काही गट पोलिसांचे बॅरिकेड तोडून दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. या हिंसाचारात १०९ पोलीस कर्मचारी जखमी झाले, तर एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. यासोबतच काही तरुणांनी लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला होता. त्यानंतर या प्रकरणी अनेक शेतकऱ्यांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच काही लोकांना अटक करण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.