Veer Savarkar : मारीत मारीत मरणे…

12
Veer Savarkar
Veer Savarkar

Veer Savarkar : वीर सावरकर सैनिकी पद्धतीने चालावयास लावीत त्याची मला (श्री. पु.) गंमतही वाटे आणि त्यांच्या मनोभूमिकेत ते कसे नेमके बसते याचा अभिमानही वाटे. तसे चालू लागले की, मनाला तरतरी येते. आणि चालताना आपल्या पायताणांचा होणारा लयबद्ध आवाज ऐकू आला की, चालत जातानाही उत्साह वाटतो. तात्यांच्या प्रत्येक वागणुकीत त्यांचे जीविताचे तत्त्वज्ञान ते स्वत: कसे आचरीत असत, याची या लयबद्ध चालीने पदोपदी आठवण येई. भारत स्वतंत्र होऊन काही सत्ता जर या नेत्याच्या हातात आली तर भारताला शत्रूची भीती वाटावयाचे कारणच उरणार नाही, असेही वाटे. त्यावेळी लढाई संपलेलीच होती. इंग्रजांचा पराभव झालेला होता आणि राजकीय वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता उत्पन्न झालेली होती. मुस्लीम लीगच्या पाकिस्तानाच्या डरकाळ्या चालू होत्या आणि मुसलमानांचे ते स्वप्न बॅ. जीनांच्या हाताने पूर्ण होणार की काय अशी धास्तीही वाटू लागली होती.

हे सर्व माहिती असूनही मी मुद्दामच तात्यांना (वीर सावरकर यांना) विचारले, “आपण असे सैनिकी आवेशाने चालून काय होणार आहे?” ते माझी कीव करावी त्या पद्धतीने हसले आणि ताडकन म्हणाले, “अरे! आपण असे चालू लागलो तरी ही चित्रपटांना चटावलेली मुले पाहू लागतील की हा म्हातारा आणि हा एक मुलगा कसे ताठ्याने चालले आहेत पाहा.” त्यांचा सैनिकी थाट पाहा! काही दिवसांनी तेही ठेक्यात आणि ठसक्यात त्यांच्या तारुण्याने त्यांना सहजच येईल ते चालू लागतील. सर्व रस्त्यांतून जर आपली ही पिढी छाती वर काढून चालू लागली तरी चाणाक्ष साहेबाच्या ते ध्यानात येईल. युद्धाच्या पराभवाने तो आधीच हबकलेला आहे. स्वत:चेच घर सावरताना त्याची फटफजिती उडते आहे. बरेच काम नाविक बंडाने नि नेताजी सुभाषांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेलेच आहे. एकूण वातावरणच बदललेले त्याला दिसले. आपले हिंदू तरुण असे दिसू लागले तर तो चंबूगबाळे घेऊन जाण्याची तयारी करू लागेल. आपले हिंदू तरुण असे दिसू लागले तर तो जिना दंगे करताना दहादा विचार करील. ही चाल म्हणजे या सैनिकी वृत्तीचे प्रातिनिधीक स्वरूप आहे. तू आपली चाल अशी ठेव, मित्रांना ठेवायला प्रवृत्त कर. एकदम वातावरण बदलले तर सगळेच पालटेल, पालटू लागेल.”

(हेही वाचा – Anant Chaturdashi 2026 : 25 सप्टेंबरला गणपती विसर्जन; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि तिथी )

तात्यांची प्रकृती अगदी अशक्त झालेली होती. अशा वेळी कोणी त्यांच्यावर हल्ला केलाच तर तो संभव नव्हता. तर ते आपल्या जंबियाने काय करणार असे नेहमी माझ्या मनात येत असे. माझ्याही जवळ ते शस्त्र असले, तरी मी तरी ऐनप्रसंगी त्याचा कितपत उपयोग करू शकेन याची मलाही नेहमी शंका वाटे. तात्यांच्या बरोबर राहताना आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे हे ध्यानात आले की, मन जरासे खचल्यासारखे होई. पुणे शहरातील कँपच्या त्या रस्त्यांतून त्यांना कोणी ओळखीतही नसे. कोणी जाणूनबुजून पाळत ठेवली तर ती आमच्या नजरेस येईल हाही संभव होताच होता. याच जाणिवेतून मी त्यांना एकदा प्रश्न केला, “तात्या, तुमचे वय आणि ही क्षीण प्रकृती पाहता आपण जो जंबिया जवळ ठेवता त्याचा कितपत उपयोग करू शकाल?- प्रसंग घडलाच तर ?”

ते नजर रोखून माझ्याकडे पाहात क्षणभर रस्त्यातच थांबले आणि चटक उसळून म्हणाले, “मी क्षीण झालो आहे. थकलो आहे, माझे वयही होत आलेले आहे, हे तुला वाटते ते अगदी खरे आहे. इथे कोणी माझ्यावर हल्ला करील असाही संभव जवळजवळ नाहीच. पण हा सर्व आपण काही गृहित कृत्ये धरून काढलेला निष्कर्ष आहे. आपला निष्कर्ष बरोबर येत राहिला आणि आपण शस्त्रधारी राहिलो तरी नुकसान काही होणार नाही. पण आपला तर्क चुकला तर? स्वामी श्रद्धानंदांचा तर्क असाच चुकला होता. अब्दुल रशीदने या हिंदूचा अंदाज चुकणार, हा अंदाज बरोबर केला होता. क्रांतिकारक जेव्हा एखादा कट करतात तेव्हा त्या माणसाच्या सवयी, आवडीनिवडी, आपल्यासारखा कोणी फिरणारा वध्य असला तर त्याचा मार्ग, त्याचे सोबती, त्याचा वेष, त्याच्या स्वत:च्या संरक्षणाची सिद्धता याचा अभ्यास करतात… या अभ्यासातून शिकार साधते… ते जाऊ दे… उद्या समज, माझ्यावर कोणी हल्ला केलाच तर निर्बंधात राहून मला कोणते शस्त्र बाळगता येईल ते मी जवळ ठेवतो… क्वचित हल्ला आलाच तर माझी प्रतिकारशक्ती कमी पडेलही. प्रतिकार कमी पडला नि मला पराभव पत्करावा लागला तर कधीच वाईट वाटणार नाही. पण प्रतिकार न करताच नुसत्या शेळीसारखा बें बें करीत मी पतन पावलो तर मला अतोनात दु:ख होईल. झुंजत राहणे हे मी आयुष्यभर केलेले आहे. कोणी हल्ला केलाच तर मारीत मारीत मरणे मला आवडेल. रडत रडत, अंदाज चुकला – मला कल्पनाच आली नाही हे म्हणणे मला कधीच मानवणार नाही, जंबिया ठेवण्याचा हेतू कोणता तो समजला ना?”

संकलन : नमिता वारणकर
संदर्भ पुस्तक : सावरकरांशी सुखसंवाद
लेखक : श्री.पु.गोखले

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.