-
ऋजुता लुकतुके
Asia Cup Trophy आशिया चषक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी विजेतेपद पटकावल्यानंतरही दोन्ही करंडक सध्या दुबईतील आशियाई क्रिकेट परिषदेच्या मुख्यालयातच आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते करंडक स्वीकारण्यास भारतीय संघांनी नकार दिल्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे करंडक भारतात कधी आणले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही निश्चित तारीख देण्यात आलेली नाही. मात्र, दोन्ही करंडक मुंबईतील वानखेडे स्टेडियममधील बीसीसीआयच्या मुख्यालयात नक्की पोहोचतील, असा विश्वास बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी व्यक्त केला आहे. (Asia Cup Trophy)
बीसीसीआयच्या ९५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर माध्यमांशी बोलताना सैकिया यांनी, “मी कोणतीही कालमर्यादा सांगणार नाही; मात्र दोन्ही करंडक एक दिवस बीसीसीआयच्या मुंबईतील मुख्यालयात येतील,” असे स्पष्ट केले. त्यामुळे करंडकांच्या भारतात परतण्याचा मार्ग अद्याप निश्चित झालेला नसला, तरी बीसीसीआय त्याबाबत आशावादी असल्याचे दिसून येते. सध्या हे दोन्ही करंडक दुबईतील एसीसीच्या मुख्यालयात आहेत. (Asia Cup Trophy)
(हेही वाचा – मंत्री Jaykumar Gore यांच्या एका विधानाने पुण्यात राजकीय खळबळ; महायुती टिकणार की स्वबळाचा नवा खेळ रंगणार?)
गेल्या वर्षी पुरुषांच्या एशिया कपनंतरही अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर यंदाच्या महिला एशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा ७२ धावांनी पराभव करून आठव्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र, मोहसिन नक्वी उपस्थित असलेल्या अधिकृत पारितोषिक वितरण समारंभात भारतीय महिला संघ सहभागी झाला नाही. त्याऐवजी भारतीय संघाने स्वतंत्रपणे पदक वितरण केले. (Asia Cup Trophy)
या निर्णयाबाबत बीसीसीआयने एसीसीला अंतिम सामन्यापूर्वीच माहिती दिली होती, असेही समोर आले आहे. बीसीसीआयने हा निर्णय संस्थात्मक असल्याचे स्पष्ट केले असून, तो खेळाडू किंवा स्पर्धेविरोधात नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, नक्वी यांचा एसीसी अध्यक्ष म्हणून कार्यकाळ एप्रिल २०२७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस हा करंडक वाद कसा मिटतो, याकडेही क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. (Asia Cup Trophy)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

