एकनाथ शिंदेंच्या Helicopter मध्ये तांत्रिक बिघाड! नेमकं काय घडलं?

एकनाथ शिंदेंच्या Helicopter मध्ये अचानक बिघाड! नेमकं काय घडलं?

27
Eknath Shinde Helicopter
Eknath Shinde Helicopter

Eknath Shinde Helicopter : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरात दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्यादरम्यान त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वडनगरहून अहमदाबादला जाण्यासाठी शिंदेंना रस्ते मार्गाचा अवलंब करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे वडनगर हेलिपॅडवर सुमारे ४५ मिनिटे हेलिकॉप्टरची प्रतीक्षा करत होते. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने अखेर त्यांनी रस्ते मार्गाने अहमदाबादकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला.

मोदींच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये शिंदेंची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरातमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वडोदरा येथेही मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाला सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. या दौऱ्यात शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची एकत्रित उपस्थिती राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

वृत्तपत्रांमधूनही मोदींना शुभेच्छा

मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्यातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांमध्ये शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जवळपास सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर या जाहिराती पाहायला मिळाल्या. मात्र, सामनामध्ये अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली नसल्याचे सांगितले जात आहे.

शिंदे-शाह भेटीचीही चर्चा

काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांच्या राजकीय समीकरणांबाबत चर्चा रंगली होती. दोघांनी एकाच गाडीतून काही अंतराचा प्रवासही केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार आणि राज्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याच्या चर्चाही काही काळापासून सुरू होत्या. मात्र, “मी राज्यातच राहणार”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा गुजरात दौरा आणि अमित शाह यांच्यासोबतची त्यांची उपस्थिती याकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर त्यांनी वडनगरहून अहमदाबादचा प्रवास रस्ते मार्गाने केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.