
-
कल्याण, प्रतिनिधी
Kalyan कल्याण पूर्वेकडील आत्माराम नगर, औदोराम नगर आणि माँ दुर्गा शाळा परिसरातील दयनीय झालेल्या रस्त्यांची स्थानिक नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड यांनी गुरूवारी तातडीने प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान रस्त्यांच्या अवस्थेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. समन्वय नसल्यामुळे जर का रहिवाशांचे हाल करत असाल तर मात्र मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा नगरसेविका डॉ. गायकवाड यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना दिला. (Kalyan)
सद्या उल्हासनगर महानगरपालिकेंतर्गत एका कंपनीमार्फत या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच अमृत योजनेंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकण्याचे कामही याच परिसरात सुरू आहे. मात्र या दोन्ही यंत्रणा आणि संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय नसल्याचे रस्त्यांच्या दुरावस्थेवरून स्पष्ट झाले आहे. समन्वयाच्या अभावामुळेच हा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे आणि तो अत्यंत खराब अवस्थेचा झाला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. (Kalyan)
(हेही वाचा – US Tariffs on India : रशियन तेल खरेदीवरून भारतावर 100% शुल्काचा धोका? अमेरिकेने नेमका काय निर्णय घेतला?)
संबंधितांकडून सकारात्मक प्रतिसाद नाही
या मार्गावर शाळा असल्याने सामान्य, तसेच दिव्यांग विद्यार्थी, पालक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या सर्वसामान्यांना चिखल तुडवत साचले पाणी आणि धोकादायक खड्ड्यांमधून जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. या भागातील रहिवाशांनी वारंवार संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांशी संपर्क साधला, परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. (Kalyan)
(हेही वाचा – पुरावे देऊन ६ महिने उलटले तरी कारवाई शून्य; Ramesh Mhatre यांच्या नगरसेवक पदावरून राजकीय वाद तापला)
…अन्यथा तीव्र आंदोलन
या साऱ्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना चांगलेच फैलावर घेतले. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून मार्ग पूर्ववत आणि सुरक्षित करावा. अन्यथा समस्त रहिवाशांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. (Kalyan)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
