
-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli MIDC डोंबिवली एमआयडीसी परिसरात नाले आणि गटारांच्या बांधकामांत निष्कृष्ट दर्जा असल्याचा आरोप करणारा अर्ज माहिती अधिकारात एमआयडीसीच्या अभियंत्यांकडे टाकून सदर अर्ज मागे घेण्यासाठी ठेकेदारकडे १५ लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ४ खंडणी बहाद्दरांना मोठ्या कौशल्याने बेड्या ठोकून गजाआड केले आहे. एकीकडे क्राईम ब्रँचने केलेल्या कारवाईचे त्रस्त अधिकारी, ठेकेदार, उद्योजकांनी स्वागत केले आहे, तर दुसरीकडे माहिती अधिकाराच्या नावाखाली ब्लॅकमेल करणाऱ्या बदमाशांचे धाबे दणाणले आहेत. (Dombivli MIDC)
दिपेश गौतम लोखंडे (३९, रा. ओमकार अपार्टमेंट, घणसोली गांव, नवी मुंबई), राहूल सुधाकर मुकादम (३०, रा. मुकादम निवास, कल्याण-भिवंडी रोड, कोनगांव), विशाल गंगाराम जानकर (३१, रा. ओम निवास, सेक्टर – ५, करंजाळे, पनवेल, जि. रायगड) आणि नरेश राजेंद्र सुर्यवंशी (२९, रा. समता नगर, सेक्टर – १, रबाडे, नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चारही खंडणी बहाद्दरांची नावे आहेत. (Dombivli MIDC)
(हेही वाचा – Dombivli MIDC मध्ये पावसाचा हाहाकार; कंपन्यांमध्ये पाणी शिरल्याने उत्पादन ठप्प)
१५ लाखांसाठी तगादा
अजवानी-मेटकन जॉईंट व्हेंचर या कंपनीला डोंबिवली एमआयडीसीमध्ये नाले व गटारांच्या बांधकामांचा ठेका दिला आहे. या कंपनीने बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असल्याबाबत एमआयडीसीच्या अभियंत्यांकडे माहितीच्या अधिकारात अर्ज दिला. सदर अर्ज मागे घेण्याचे बदल्यात मे. अजवानी-मेटकॉन जॉईंट व्हेन्चर या कपंनीच्या सुपरवायझरकडे १५ लाख रूपये खंडणीची वारंवार मागणी केली जात असल्याची तक्रार क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटकडे आली होती. (Dombivli MIDC)
बर्गर शॉपमध्ये कारवाई फत्ते
जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त, डॉ. पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे, सपोनि बळवंत भराडे, सपोनि सर्जेराव पाटील, पोउनि एस .एम. तावडे, सपोउपनि बालाजी शिंदे, हवा. सुधीर कदम, सचिन कदम, गुरूनाथ जरग, सतिश सोनावणे, मिथून राठोड, गोरक्ष शेकडे यांनी के. व्ही. पेंढरकर कॉलेज जवळ सापळा लावला होता. एम एच ४३/सी एम/०२६२ आणि एम एच ०४/एम एन/७६९१ क्रमांकाच्या कारमधून उतरून पेंढरकर कॉलेज जवळच्या एका बर्गर शॉपमध्ये या चारही खंडणी बहाद्दरांना पथकाने रंगेहाथ अटक केली. (Dombivli MIDC)
(हेही वाचा – Isobutanol Diesel Blend : पेट्रोलनंतर आता डिझेलचा नंबर? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा नवा ‘बायोफ्युअल’ मास्टरप्लॅन काय?)
मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
मे. अजवानी-मेटकॉन जॉईंट व्हेन्चर या कपनीच्या सुपरवायझरने दिलेल्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्य कलम ३०८ (२), ३०८ (३),(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई दरम्यान रोख रक्कम, ५ मोबाईल फोन तसेच दोन चारचाकी वाहने असा एकूण २१ लाख १० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या चौकडीने अशा प्रकारचे उपद्व्याप यापूर्वीही केले आहेत का? त्यांच्या विरोधात अन्य कुठे गुन्हे दाखल आहेत का? अशा कारनाम्यांमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का? या साऱ्या प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी क्राईम ब्रँचने तपास चक्रांना वेग दिला आहे. (Dombivli MIDC)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
