WPL 2026 : ‘तिला खूपच सहन करावं लागलंय,’ – स्मृतीसाठी संघ सहकाऱ्याचा भावनिक संदेश

75
WPL 2026 : ‘तिला खूपच सहन करावं लागलंय,’ - स्मृतीसाठी संघ सहकाऱ्याचा भावनिक संदेश
WPL 2026 : ‘तिला खूपच सहन करावं लागलंय,’ - स्मृतीसाठी संघ सहकाऱ्याचा भावनिक संदेश
  • ऋजुता लुकतुके 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने बडोद्यात बीसीए स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत आपले दुसरे महिला प्रीमियर लीग(WPL 2026)विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयामध्ये कर्णधार स्मृती मानधनाची भूमिका निर्णायक ठरली असून आरसीबीची फिरकीपटू श्रेयंका पाटील हिने या यशाचे श्रेय थेट आपल्या कर्णधाराला दिले आहे.(WPL 2026)

सामन्यानंतर बोलताना श्रेयंका पाटील म्हणाली, “मला तीन जणांचा खास उल्लेख करायचा आहे. सर्वात आधी स्मृती, कारण गेल्या काही महिन्यांत तिने खूप काही सहन केले आहे. हा विजय मी तिला समर्पित करते. त्यानंतर आमचे मुख्य प्रशिक्षक मालोलन रंगराजन आणि सहाय्यक प्रशिक्षक अन्या श्रब्सोल. आज अन्याच्या मुलाचा पहिला वाढदिवस आहे, त्यामुळे हा दिवस आणखी खास आहे. मालो यांचा हा मुख्य प्रशिक्षक म्हणून पहिलाच हंगाम असून हा विजय आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.”

हा डब्ल्यूपीएल हंगाम श्रेयंका पाटीलसाठी पुनरागमनाचा ठरला. तिने ९ सामन्यांत ११ विकेट्स घेतल्या. अंतिम सामन्यात तिला विकेट मिळाली नसली, तरी संघाच्या यशात तिचा मोलाचा वाटा राहिला. “हा हंगाम माझ्यासाठी अतिशय खास आहे. इतका सुंदर पुनरागमन हंगाम मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. प्रेक्षकांचा पाठिंबा अप्रतिम होता,” असेही तिने सांगितले.

(हेही वाचा – Mumbai Pune Expressway वरील ‘महाकोंडी’ सुटली; बोरघाटातील वाहतूक सुरळीत )

अंतिम सामन्यात स्मृती मानधनाने ४१ चेंडूत ८७ धावांची झंझावाती खेळी करत जॉर्जिया व्होल (५४ चेंडूत ७९ धावा) हिच्यासोबत दुसऱ्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी केली. डब्ल्यूपीएल अंतिम सामन्यातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. २०४ धावांचे आव्हान आरसीबीने यशस्वीरित्या पार करत इतिहास घडवला.

दरम्यान, अष्टपैलू राधा यादव हिने अखेरच्या षटकांत केलेल्या झटपट १२ धावांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. “व्यवस्थापनाने आमच्यावर प्रचंड विश्वास ठेवला. हा विजय त्यांच्यासाठी आहे,” असे ती म्हणाली.

या विजयासह आरसीबीने डब्ल्यूपीएलमध्ये आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले, तर दिल्ली कॅपिटल्सला सलग चौथ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.