Dombivli : नाला दुर्घटनेला तीन महिन्यांनी कलाटणी; आयुषच्या मृत्यूपश्चात घरच्यांना मिळणार भरपाई

बेजबाबदारांकडून सहा लाख वसूलीचे उच्च न्यायालयाचे आदेश, केडीएमसीच्या फिर्यादीवरून अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल

113
Red barriers around an open drain in Dombivli.
Dombivli : नाला दुर्घटनेला तीन महिन्यांनी कलाटणी; आयुषच्या मृत्यूपश्चात घरच्यांना मिळणार भरपाई
  • कल्याण, प्रतिनिधी

सप्टेंबर महिन्यात नवरात्रौत्सवाच्या कालावधीत पश्चिम डोंबिवलीतील जगदांबा माता मंदिराजवळ असलेल्या नाल्याला जोडणारे झाकण उघडे ठेवल्याने त्याच परिसरात राहणारा आयुष एकनाथ कदम हा १३ वर्षीय मुलगा जेवण झाल्यानंतर हात धुण्यास गेला आणि बेपत्ता झाला होता. उघड्या झाकणामुळे नाल्यात पडून आयुषचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेला तीन महिन्यांनी कलाटणी मिळाली आहे. या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाने स्वत:हून गंभीर दखल घेतली आहे. झाकण उघडे राहिल्याने मुलाचा मृत्यू झाल्याने या हलगर्जीपणाला जबाबदार असलेल्या शासकीय आस्थापनेचा अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित व्यक्तिंकडून सहा लाख रूपयांची वसूली करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. (Dombivli)

रविवारी २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घटना घडली तो परिसर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अखत्यारित असला तरी तेथे एमएमआरडीएकडून बाह्यवळण रस्त्यावर पूल बांधण्याची कामे सुरू आहेत. आयुष ज्या ठिकाणी मरण पावला त्या परिसरातील रहिवाशांनी दिलेली माहिती आणि काही माध्यमांमार्फत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार दुर्घटना घडली त्या ठिकाणी एमएमआरडीएच्या ठेकेदाराकडून बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू आहे. नाल्यावर पूल बांधला जात आहे. त्या ठिकाणी अवजड वाहने धावत असतात. या वाहनांमुळे नाल्यावरील झाकण तुटले होते. धोका होऊ नये यासाठी ठेकेदाराने तुटलेल्या झाकणाच्या चारही बाजूंनी रोधक उभे केले होते. (Dombivli)

याच दरम्यान या भागात जगदंबा माता मंदिरात नवरात्रौत्सव सुरू होता. तेथील नाल्यावर मंडप उभारून जवळच स्वयंपाकाची भांडी घासणे आणि जेवण झाल्यानंतर भाविकांना हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी पुरेशी विजेच्या दिव्यांची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. नाल्यावरील तुटलेले झाकण कुणीतरी अज्ञात इसमाने सरकवले असावे. त्यातच आयोजकांकडून पुरेसे नियोजन करण्यात आले नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे केडीएमसीच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांकडून सांगण्यात आले. दुर्घटना रात्रीच्या वेळेत घडली त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. नाला दुथडी भरून वाहत होता. जेवल्यानंतर आयुष हात धुण्यास गेला आणि नाल्यात पडला. हे पाहून एका स्थानिकाने जीवाची पर्वा न करता नाल्यात उडी मारून आयुषला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्यातील पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे वाहत जाऊन आयुष एका झाडाच्या आडोशाला अडकला होता. स्थानिकांंसह अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले होते. (Dombivli)

(हेही वाचा – RELOS Agreement : भारत आणि रशिया एकमेकांच्या देशामध्ये सैन्य तैनात करू शकणार; पुतीन यांची करारावर स्वाक्षरी)

न्यायालयाच्या सुमोटोमुळे केडीएमसीला जाग

मुंबई उच्च न्यायालयाने मृत आयुष कदमच्या कुटुंबीयांना भरपाईचे आदेश दिल्यानंतर जागरूक झालेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सदर दुर्घटना घडल्याच्या तीन महिन्यानंतर अज्ञात इसमा विरूध्द गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी मलनिस्सारण विभागाचे उपअभियंता लिलाधर नारखेडे यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीला अनुसरून पोलिसांनी अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Dombivli)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident : मुलाला पाठीशी घालण्यासाठी बदलले रक्ताचे नमुने; विशाल अगरवालचा जामीन पुन्हा फेटाळला)

नेत्या-पुढाऱ्यांकडून भरपाईसाठी प्रयत्न

आयुष कदम हा महात्मा फुले रोडला असलेल्या स्वामी विवेकानंद शाळेत सातव्या इयत्तेत शिक्षण घेत होता. त्याच्या कुटुंबीयांना भरपाई मिळावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली होती. डोंबिवलीचे आमदार तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे, स्थानिक माजी नगरसेवक प्रकाश भोईर, सरोज भोईर, दिपेश म्हात्रे आदींनी आयुषच्या कुटुंबीयांंची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.