मुंबई पब्लिक स्कूलच्या नामफलकावरच १२ कोटींचा खर्च

89

मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या मागील दहा वर्षांत ७० टक्क्यांनी घटलेली असून, एकेकाळी मराठी नामफलकासाठी लढणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी शाळा बंद करण्याचा चंगच बांधल्याची टीका भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे. एवढेच नाही तर सर्व शाळांसमोर तब्बल १२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

महापालिकेच्या मराठी शाळांमधील पटसंख्या घटत आहे, तर दुसरीकडे इंग्रजी भाषेला अधिक प्राधान्य दिले जात असल्याच्या मुद्द्याबाबत भाजपाचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी चिंता व्यक्त करत, सत्ताधारी पक्षाला आयोजित पत्रकार परिषदेत इशारा दिला.

(हेही वाचाः मुंबईतील मराठी शाळांबाबत भाजपा आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र, काय आहे पत्रात?)

सत्ताधा-यांकडून मराठी भाषेचा अवमान

महापालिकेत सलग २५ वर्षे शिवसेनेची सत्ता असतानाही मराठी भाषेची दुरावस्था झाल्याचे सांगत शिवसेनेच्या युवा नेतृत्वाने मराठी शाळा बंद करण्याचा चंगच बांधला की काय, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. महापालिकेच्या मराठी शाळा एक-एक करत करत बंद करुन, इंग्रजी शाळा, सीबीएससी आणि आयसीएससी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापालिका शाळांच्या इंग्रजी नामकरणासाठी व इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्यांसाठी मायबोली मराठी भाषेचा अवमान केला जात आहे. महापालिका शाळांचे नामांतर मुंबई पब्लिक स्कूल असे करण्यात येत असून, त्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांसमोर तब्बल १२ कोटी रुपये खर्च करुन प्रवेशद्वार उभारण्यात येत आहेत. याला भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

याला जबाबदार कोण?

इंग्रजी ही काळाची गरज आहे, परंतु यासाठी मराठीची गळचेपी होऊ नये, असे सांगत मागील दहा वर्षांत मराठी शाळांची पटसंख्या ७० टक्क्यांनी घसरली आहे. नवीन उपक्रमाला चालना देताना मायभूमीची ही अवस्था झालेली आहे, याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे मराठी शाळांच्या दुरावस्थेला कोण जबाबदार, असा सवाल करत शिंदे यांनी मराठी शाळांबाबत श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे.

(हेही वाचाः १० वर्षांपासून मुंबईतील १०४ मराठी शाळांचे महापालिकेने रखडवले अनुदान! )

लक्ष द्यायला हवे

मागील दहा वर्षांत १ लाख २ हजार २१४ पटसंख्या ही ३३ हजार ११४ वर आली आहे. तर दहा वर्षांत मराठी माध्यमाच्या शाळा ४१३ वरुन २८० एवढ्या झाल्या आहेत. त्यामुळे मराठी भाषिक शाळांची पटसंख्या कशाप्रकारे वाढेल याकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे महापालिका पक्षनेते विनोद मिश्रा आणि प्रवक्ते भालचंद्र शिरसाट व बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.