Mumbai Metro शहराची नवी जीवनवाहिनी

698
Mumbai Metro शहराची नवी जीवनवाहिनी
Mumbai Metro शहराची नवी जीवनवाहिनी
  • स्वप्नील सावरकर

२६जुलै २००६ चा प्रलय आठवतोय? तेव्हा मुंबई काही दिवसांसाठी अक्षरशः ठप्प झाली होती. मुंबई स्पिरीट वगैरे कितीही तुम्ही बोंबलात तरी निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही, हे या घटनेनंतर अनेकदा निसर्गानं दाखवून दिलं. पावसाच्या तडाख्यात मुंबईची जीवनवाहिनी म्हणून जगभरात डंका पिटली जाणारी उपनगरीय रेल्वेसेवाही रस्त्यांप्रमाणेच पूर्णतः कोलमडते, हे आता वारंवार सिद्ध झालंय. परंतु, गेल्या आठवड्यातही २६ जुलैच्या प्रलयाची आठवण करून देणाऱ्या पावसाच्या दणक्यात एक घटना अशी घडली जी कोणत्याच मीडियाने दाखवली नाही. ती म्हणजे मुंबईतल्या लोकल, बसेस, टॅक्सी, रिक्षांपासून अगदी मोनोपर्यंतच्या सर्व परिवहन सेवा ठप्प पडत असताना भुयारी आणि उन्नत मेट्रोसेवा भर पावसातही सुखनैव सुरू राहिली. मुंबईच्या नशिबात ३६५ दिवसांपैकी पावसाळ्यातील काही दिवस हे ठप्प होण्यासाठीच आहेत की काय अशी अवस्था आज तरी आहे. परंतु, संपूर्ण मेट्रो कार्यान्वित झाल्यावर ठप्प मुंबई हे चित्र दिसणं कठीण होईल.

चांगल्याला चांगलं म्हणायलाही शिकलं पाहिजे, हे सध्याच्या मीडियाला शिकवणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील सीप्झ ते वरळी अशी भूमिगत मेट्रो सुरू झाली. परंतु, कंत्राटदाराच्या हलगर्जीमुळे आणि सरकारच्याही दुर्लक्षामुळं थोड्याशा पावसाने अर्धवट कामांमुळे या मेट्रोच्या एका ठिकाणी पावसाचे पाणी जमले आणि काही भाग पडला, त्यानंतर २४ तास तीच तीच दृश्ये दाखवल्याने अनेक मुंबईकरांनी या एक्वा लाईनमधून प्रवास करण्याचा धसकाच घेतला. आणि, त्याचीच प्रचीती गेल्या आठवड्यातल्या पावसात आली. पावसाने मुंबईची दाणादाण उडवली तेव्हाही हा मेट्रो मार्ग(Metro Road) सुरळीत असूनसुद्धा मुंबईकर इतरत्र अडकून पडले, पण म्हणावा तितका वापर या मेट्रो मार्गांचा केला नाही.

(हेही वाचा – Asia Cup 2025 साठी जपानचा हॉकी संघ भारतात दाखल)

देर आये दुरुस्त आये…

तसे पाहिले तर पश्चिम बंगालमधील डाव्यांच्या शासनकाळात कोलकाता(Kolkata)मध्ये १९८४ साली पहिली मेट्रो आली. मुंबईसारख्या जगातील सर्वात दाट लोकसंख्येपैकी एक असलेल्या शहरात ती येईपर्यंत तब्बल २०१४ साल उजाडावं लागलं. अर्थात, केंद्रात आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारांच्या (Congress Govt) काळात सर्वच गोष्टी संथगतीने व्हायच्या, याचं हे पण एक उत्कृष्ट उदाहरण मानावं लागेल. असो, देर आये दुरुस्त आये..! मुंबईतल्या पहिल्या मेट्रोला जून २०१४ मध्ये सुरुवात झाली. अंधेरी वर्सोवा ते घाटकोपर अशी पश्चिम आणि मध्य उपनगरांना जोडणाऱ्या मेट्रो लाईन-१ ने क्रांती घडवली. २ तासांचे अंतर केवळ २१ मिनिटांवर आणले. ११.४० किमी लांबीची ही मेट्रो रस्त्यावरचे ४५ सिग्नल टाळून उन्नत मार्गानं प्रवाशांना पटापट इच्छित स्थळी पोहोचवत आहे. या पहिल्या मार्गाला मिळालेल्या प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या मार्गाची प्रवासी घनता जगात आठव्या क्रमाकांवर पोहोचली. कोरोनानंतर तर दिवसाला या मेट्रोतून ४ लाखांहुन अधिक प्रवासी प्रवास करत असतात. आणि आता नव्याने या लाईनला संलग्न असलेल्या मेट्रो २-अ (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते गुंदवली) या मार्गांवरही ३ लाखांहुन अधिक प्रवासी रोज प्रवास करू लागले आहेत. ही संख्या वाढतच जाणार आहे.

मुंबई मेट्रो (Mumbai Metro) मास्टर प्लॅननुसार, मुंबई महानगर प्रदेशात एकूण ३७४ किमी लांबीचे १२-लाईन नेटवर्क तयार केले जात आहे. यात अजून २ लाईन वाढणार आहेत.  यापैकी सध्या ५८.९ किमी लांबीच्या चार लाईन्स कार्यान्वित आहेत. उर्वरित १६५.७ किमी लांबीच्या आठ अतिरिक्त लाईन्सवर बांधकाम वेगाने सुरू आहे. यामध्ये मेट्रो २बी (डीएन नगर ते मंडाले), मेट्रो ३ (कुलाबा ते सिप्झ), मेट्रो ४ (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो ५ (ठाणे ते कल्याण), मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी), मेट्रो ९ (दहिसर ते मीरा भाईंदर) अशा अनेक महत्त्वाच्या मार्गिकांचा समावेश आहे.

या आकडेवारीतून एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट होतो,नव्या मार्गिकांमुळे जुन्या मार्गांवरही प्रवासी संख्या वाढली आहे. ही प्रणाली आता एकाच मार्गापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण शहराला जोडणारी एकसंध जीवनवाहिनी म्हणून काम करत आहे. प्रवाशांना एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर सहजपणे स्विच करण्याची सोय मिळाल्यामुळे (उदा. डीएन नगर आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्थानकांवर), संपूर्ण प्रवासाचा अनुभव अधिक कार्यक्षम झाला आहे. वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायी प्रवास, वाहतूक कोंडीत घट, हे फायदे आहेत. आयआयटीच्या सर्वेक्षणानुसार, आत्तापर्यंत २५ टक्के खाजगी गाडीधारक मेट्रोकडे आकर्षित झालेत. कुलाबा ते बांद्रा-सिप्झ कॉरिडॉरमध्ये मेट्रोमुळे वाहतूक सुमारे ३५% ने कमी होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे दररोज सुमारे ४.५० लाख वाहने रस्त्यांवरून कमी होतील. यामुळे सध्या कफ परेड ते विमानतळापर्यंत १०० मिनिटे लागणारा प्रवास ५० मिनिटांपर्यंत कमी होईल. रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे दररोज २.५ लाख लीटर इंधनाची बचत होईल, ज्यामुळे वार्षिक ५५० कोटी रुपयांची बचत अपेक्षित आहे. तसेच, हवा आणि आवाजाच्या प्रदूषणातही लक्षणीय घट होईल. मेट्रो स्थानकांच्या जवळील रिअल इस्टेटच्या किमतींमध्ये १५-२०% वाढ झाली असून भविष्यात अजून १०-१५% वाढीची शक्यताही आहे. येत्या काळात ३४ मेट्रो (Mumbai Metro) स्थानके ३९ उपनगरीय रेल्वे स्थानकांशी जोडली जातील, त्यामुळे उत्कृष्ट कनेक्टिव्हीटी असणारे जागतिक शहर ही मुंबईची ओळख बनेल.

(हेही वाचा – Love Jihad : हिंदू असल्याचे सांगत सलमान तब्बल १० वर्षे हिंदू मुलीचे करायचा लैंगिक शोषण)

आपली मेट्रो जगात भारी

न्यू यॉर्कची मेट्रो अनेक वर्षांपासून पुराच्या आव्हानांना तोंड देत आहे. MTA दररोज १४ दशलक्ष गॅलन पाणी बाहेर काढते. वादळाच्या वेळी ते पूरप्रवण भागात अतिरिक्त कर्मचारी आणि पंप तैनात करतात. त्यांची ही लवचिकता ही प्रतिक्रियात्मक व्यवस्थापनावर आधारित आहे, जिथे बिघाड झाल्यानंतर उपाययोजना केली जाते. तरीही, मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे अनेकदा सेवा विस्कळीत होते. थोडक्यात, मुंबईचे सिंगापूर, कॅलिफोर्निया वगैरे घोषणा आजवर कागदावर होत्या. आता वाहत्या मुंबईची नवी जीवनवाहिनी म्हणून मेट्रो (Mumbai Metro) ओळखली जाईल आणि ५० वर्षांनंतरही अशीच अखंडित सेवा देत बदलत्या मुंबईच्या शिरपेचातला मानाचा तुरा ठरेल!

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.