Heavy Rain : गड्या आपली मुंबईच बरी!

1633
Heavy Rain : गड्या आपली मुंबईच बरी!
Heavy Rain : गड्या आपली मुंबईच बरी!
  • सचिन धानजी

१८ऑगस्टपासून मुसळधार पावसाने (Heavy Rain) मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं. अगदी डोळे झाकून पाऊस कोसळला की, काही क्षणात सर्वत्र पाणीच पाणी झाले. एक असा कुठला भाग पाण्याशिवाय राहिला नव्हता. जिथं नजर टाकावी, तिथं पाणीच पाणी दिसत होत. केवळ शहरी भागांतच नाही, तर गावागावांमध्ये हे चित्र दिसत होतं. तुंबून राहिलं की, मग लोकांना ज्या यातना सहन कराव्या लागतात, त्याचे वर्णन करता येऊ शकत नाही. जेव्हा साचलेलं पाणी ओसरतं, तेव्हा लोकांचा जीव भांड्यात पडतो. ते दु:ख काही वेगळंच असतं. असंच दु:ख नालासोपाऱ्यातील (Nala Sopara) जनतेने अनुभवले. खरंतर ज्या शहरात समुद्राच्या भरती आहोटीवर आधारित पावसाचं पाणी साचतं, ते पाणी जर ओहोटीबरोबरच ओसरत असेल, तर त्या शहराचे योग्य नगर नियोजन आहे, असे म्हणायला हरकत नाही. ज्या शहरांत पाणी तुंबूनच राहतं. पाच ते सहा दिवस ते पाणी ओसरत नाही, त्या शहराच्या नियोजनातच मोठ्या त्रुटी आहेत. त्याचं योग्य प्रकारे नियोजन झालेलं नाही, असं म्हणता येईल.

नालासोपारा(Nala Sopara) पूर्व परिसरात हा लोकवस्तीचा दाटीवाटीचा परिसर म्हणून ओळखला जातो. एक प्रकारे मुंबईतील धारावीप्रमाणे नालासोपारा पूर्व परिसर हा उभी धारावी म्हणता येईल. त्या तुलनेत पश्चिमेला लोकवस्ती प्रमाणात आहे. ज्या प्रकारे पाऊस पडायला सुरुवात झाली आणि मंगळवार सकाळपासून पाण्याने जे काही रस्ते काबिज केले, तर त्यांनी सोडायचं नाव घेतलंच नाही. पाण्याने रस्त्यावर केलेली ही घुसखोरी मोडून काढण्यात किंवा त्या पाण्याचा निचरा पंपाद्वारे करून त्यांच्या घुसखोरीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात वसई विरार महापालिका प्रशासनाला अपयश आलं होतं. ज्या पूर्व बाजूस कायमच पाणी भरतं, तेथील पाण्याचा निचरा बुधवारीच झाला. पश्चिम बाजूस असलेल्या परिसरातील पाण्याचा निचरा चार दिवस झाला नाही, यापेक्षा प्रशासनाचं मोठं अपयश कोणतं? (Heavy Rain)

(हेही वाचा – BMC Schools : महापालिका शाळेतील मुलांचे ऑनलाईन शिक्षण बंद, मिळाली हक्काची जागा)

महापालिकेची इच्छाशक्ती आहे का?

मुंबईत कोणत्या सखल भागांमध्ये पाणी तुंबणार, याची रेकी करून तिथं पंप लावण्याचे नियोजन करत, पंपाद्वारे ते साचलेलं पाणी दुसऱ्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करतं, तर मग वसई-विरार महापालिका प्रशासनाला हे का करावसं वाटत नाही? मुळातच जिथे तीन मजल्यांच्या इमारती होत्या तिथे आता ०७ ते २१ मजल्यांचे टॉवर उभारले जात आहेत. पण पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या व वाहून नेणाऱ्या पर्जन्यवाहिन्यांचं काय? रस्त्यांचं काय? कचऱ्याच काय? एक असा रस्ता नाही, जिथे खड्डे नाहीत. एक अशी पर्जन्य जलवाहिनी नाही की, ती सुस्थितीत आहे. त्यातून पाण्याचा निचरा योग्यप्रकारे सुरु आहे. पाणी वाहत आहे. कोणत्याही पर्जन्य जलवाहिनीत डोकावून पाहिलं, तर पाणी जिथल्या तिथंच. सात ते आठ कंत्राटी कामगार पाच ते सहा महिन्यांनी या पर्जन्य जलवाहिनीतील मॅनहोल्समधून गाळ काढण्याचं काम करत असले, तरी सर्वच पर्जन्य जलवाहिनीतून तो गाळ काढायला हवा. एक ते दोन मॅनहोल्समधून केवळ दाखवायला म्हणून काढला जाऊ नये. अशा प्रकारे गाळ काढून पर्जन्य जलवाहिनी सुस्थितीत आणता येत नाही. जर पर्जन्य जलवाहिनीतील पाणी वाहत नसेल, तर पावसाचे साचलेलं पाणी त्यात जाणार कसं आणि त्याचा निचरा होणार कसा? (Heavy Rain)

लाईट नाही, पाणी नाही

नालासोपारा(Nala Sopara) शहराच्या नियोजनात वसई-विरार महापालिका प्रशासन पुरते फसले आहे. मंगळवारी १९ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून जो वीजपुरवठा खंडित(Power Outage) केला, तो गुरुवारी २१ ऑगस्ट या दिवशी दुपारनंतर पूर्ववत करण्यात आला. तब्बल ३६ ते ४० तास येथील नागरिकांना तुंबलेल्या पाण्यामुळे विजेशिवाय घरात कोंडून रहावं लागलं. एक प्रकारे पोलिसांच्या नजरकैदेत ठेवलं जातं, तसाच काहीसा अनुभव नालासोपाऱ्यातील जनतेला आला असेल. पावसाच्या नजरकैदेत ठेवतानाच लोकांचा संपर्क आणि संवादही बंद करून टाकला होता. वीजपुरवठा खंडित केल्याने मोबाईल नेटवर्क सेवाही बंद झाली होती. त्यामुळे लोकांना मोबाईलवरून कुणाशी संपर्कही साधता येत नव्हता. नातेवाईक फोन करून खुशाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही फोन लागत नसल्याने तेही हवालदिल होत होते. एकूणच गैरसोय. प्यायला पाणी नाही म्हणून लोकांनी टाकीतील पाणी उकळून पिण्याची वेळ आली, वीज नसल्याने घरात अंधार पसरलेला. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशातच रात्र घालवावी लागली. घरातील टाकीतील पाणी किती दिवस पुरू शकते? ती टाकीही रिकामी झाल्यानं मग अनेक कुटुंबांना पाण्यासाठी कंबरभर पाण्यातून वाट काढून धावाधाव करावी लागत होती. मात्र हा अनुभव नालासोपाराकरांना नवीन नाही. सन २०१८ मध्ये अशाच प्रकारे पावसाने पाच दिवस लोकांना आपल्या नजरकैदेत ठेवलं होतं. त्याचा अनुभव असल्याने जुन्या लोकांनी आपल्या या अनुभवाच्या आधारे आधीपासून काटकसरीचे धोरण अवलंबले, तरीही काही अंशी त्रास व्हायचा तो झालाच. एकूणच काय तर प्रशासनाच्या दुलर्क्षित धोरणामुळे नालासोपाराकरांना पाण्यात जावं लागलं. (Heavy Rain)

(हेही वाचा – Skill Center : कांदिवलीतील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र युवक युवतींसाठी दिपस्तंभ)

बीएमसीचे उत्कृष्ट प्रशासन

आज मुंबईत साधं पाणी साचलं, तरी समाज माध्यमांमध्ये मुंबईची तुंबई म्हणून चर्चा सुरु होते. खरी तुंबई कुठली असते, ती नालासोपाराप्रमाणे. जे पावसाचे पाच दिवस हलतच नाही, निचरा होत नाही, त्याला आपण तुंबई म्हणून शकतो. मुंबईत साधा खड्डा दिसला, तरी ‘खड्डयात मुंबई’ अशी बातमी होते. कचऱ्याचे ढिग दिसले, तरी ‘कचऱ्यात मुंबई’ अशा बातम्या होत्या. मुंबईतील पत्रकार आणि सामाजिक संस्था तसेच कार्यकर्ते एवढे जागृत आहेत की, या गोष्टी ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊन उपाययोजना आणि अंमलबजावणी करायला भाग पाडतात. त्यामुळे मुंबई महापालिका (BMC) प्रशासन पावसाळ्यातील उपाययोजनांबाबत मग तो नाल्यातील गाळ काढण्याचा असो वा झाडांच्या फांद्यांची छाटणी, कचरा उचलण्यासंदर्भात असो वा सखल भागांमध्ये पाणी तुंबू नये, म्हणून पाण्याचा निचरा योग्यप्रकारे व्हावा म्हणून पंप लावण्याचे काम ते अत्यंत जबाबदारीने करत असतात. महापालिका आयुक्तांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व अतिरिक्त आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सहआयुक्त, उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्त, तसेच त्यांचे अभियंते व कर्मचारी वर्ग जो काही पावसातही झपाटून काम करत असतो, त्याला खरोखर सलाम ठोकावा लागेल. त्यामुळे नालासोपाऱ्यात राहायला आलेल्या नागरिकांना ‘गड्या आपली मुंबईच बरी’ असे म्हणण्याची वेळ येते. मुंबई महापालिका प्रशासन शहराच्या नियोजनासाठी जेवढं काम करतं, त्यांच्या दहा टक्के जरी काम इतर महापालिकांनी केल्यास त्या त्या शहरांमध्ये सेवा सुविधा पुरवल्या जातील आणि जनतेला दिलासा मिळू शकेल. (Heavy Rain)

शहराचे नियोजन करणे आवश्यक

नालासोपारा(Nala Sopara) हा गरीबोंका सहारा, असं सर्वसाधारण बोललं जातं, पण पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतर ते बेसहारा होतात. पावसात कुणीच मदतीला येत नाही. ना महापालिका, प्रशासन ना, लोकप्रतिनिधी ना, मतांचा जोगवा मागायला येणारे पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी. आज नालासोपाऱ्यात उंचच उंच टॉवर उभे राहत आहेत. जर या ठिकाणी दोन ते तीन दिवस पावसामुळे वीज पुरवठा खंडित होणार असेल तर उंचावर घर घेणाऱ्यांचे काय होणार आहे? जनरेटरचा बॅकअप किती दिवस पुरणार? त्यामुळे आधी शहराचे नियोजन योग्य प्रकारे करण्याच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी टोलेजंग इमारतींना परवानगीच देण्यात येऊ नये. त्यामुळे जोपर्यंत या शहराची सर्व पायाभूत सेवा सुविधा आणि प्रकल्पांद्वारे रचना केली जात नाही, पाण्याची मागणी पूर्ण केली जात नाही, वाहतुकीस पुरेसे रस्ते तयार होत नाहीत, पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या पर्जन्य जलवाहिनींमध्ये वाढ केली जात नाही, मलनि:सारण वाहिन्यांमध्ये वाढ केली जात नाही, तोपर्यंत येथील टोलेजंग इमारतींना बंदी आणायला हवी किंबहुना महापालिका प्रशासनाने, यासाठी पुढाकार घेऊनही कामे त्वरीत हाती घ्यायला हवी. आज जनतेची प्रशासनाकडून सेवा सुविधांची अपेक्षा आहे, पण याच सुविधा जर स्थानिक महापालिका प्रशासन देऊ शकत नसेल आणि लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करत नसतील, तर यासारखे या शहराचे आणि या ठिकाणी राहणाऱ्या जनतेचे दुर्भाग्य नसेल. तेव्हा सन २०१८ नंतर २०२५मध्ये जी काही पूरपरिस्थिती आली आहे, हा सप्तफेरा पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे २०३२ पूर्वी प्रशासनाने नालासोपाऱ्याचा विकास आराखडा तयार करून प्राधान्यकामे हाती घेतली तर ठीक, नाहीतर नालोसापारा हा कायमच नाल्यातच राहील. (Heavy Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.