फिनलँडमधील शिक्षण पद्धत समजून घेण्यासाठी BMC च्या शिक्षकांना पाठवा; राज्यपालांच्या सूचना

203
फिनलँडमधील शिक्षण पद्धत समजून घेण्यासाठी BMC च्या शिक्षकांना पाठवा; राज्यपालांच्या सूचना
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

शालेय अभ्यासक्रमासोबत मैदानी खेळांनाही आयुष्यात खूप महत्त्व आहे. शारीरिक व्यायामामुळे आपल्यात सतत चैतन्य संचारलेले असते. त्यामुळे आतापासूनच व्यायामाला वेळ द्या. तसेच मुंबईत जागेअभावी खेळांची मैदाने कमी असल्यामुळे शाळांना चक्रीय पद्धतीने मैदाने उपलब्ध करून द्यावीत, अशी सूचना राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी करतानाच फिनलँड देशातील शिक्षण पद्धतीचा दाखला देत महानगरपालिकेच्या काही शिक्षकांना तेथील शिक्षण पद्धती समजून घेण्यासाठी पाठवावे, असेही आवाहन महापालिका प्रशासनाला दिले आहेत. (BMC)

शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी फेस मुंबई पब्लिक स्कूलमध्ये माननीय राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव आणि शालेय साहित्य वितरण सोहळा मंगळवारी १७ जून २०२५ रोजी पार पडला. यावेळी ते बोलत होते. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, राज्यपाल यांचे उपसचिव एस. रामामूर्ती, महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – CC Road : मुंबईत दोन वर्षांत ७७१ रस्त्यांची सिमेंट काँक्रिटची कामे झाली पूर्ण; ६१४ रस्ते राहिले अर्धवट)

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी सभागृहात प्रत्येक विद्यार्थ्याला चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच, विद्यार्थ्यांशी संवाद साधून शुभेच्छा देखील दिल्या. पाच विद्यार्थ्यांना माननीय राज्यपाल यांच्या हस्ते २७ प्रकारच्या शालेय साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले. शालेय अभ्यासक्रमासह तसेच आपल्या मातृभाषेसह इतरही भाषांवर प्रभुत्व मिळवा. नवनवीन भाषा शिकल्याने प्रगतीच्या भरपूर वाटा खुल्या होतील. जगभरात भरारी घेण्याची क्षमता निर्माण होईल. सतत नवनवीन संधीच्या शोधात राहा. ज्या गोष्टीबाबत, रंजक माहितीबाबत कुतूहल वाटत असेल त्याबाबत शिक्षकांकडून मार्गदर्शन घेत राहा. सतत प्रश्न विचारत राहा, असा मोलाचा सल्लाही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना दिला. (BMC)

महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शालोपयोगी साहित्य मोफत वितरित करण्यात येते. या साहित्यामध्ये गणवेश, वह्या, कंपासपेटी, चित्रकलेसाठी आवश्यक साहित्य, पेन्सिल, पाण्याची बाटली, डबा, दप्तर, बूट, सॅण्डल, मोजे आदी वस्तूंचा समावेश आहे. हे संपूर्ण साहित्य माननीय राज्यपाल यांच्या हस्ते पाच विद्यार्थ्यांना प्रातिनिधि स्वरुपात वाटप करण्यात आले. यंदा दहावीत सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या वरळी सी फेस महानगरपालिका माध्यमिक शाळेमधील अक्षरा अजय वर्मा (९६.८० टक्के) या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाबाबत माहिती दिली. यानंतर राज्यपालांनी वरळी सी फेस शाळेतील बालवाडीचे वर्ग, विज्ञान प्रयोगशाळेला भेट दिली. या वर्गातील फर्निचरचे राज्यपालांनी कौतुक केले. (BMC)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack नंतर काश्मीरच्या पर्यटनाला गतवैभव; अनेक पर्यटनस्थळं पर्यटकांसाठी खुली)

कवळेमठ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव

दरम्यान, वाळकेश्वर (मलबार हिल) परिसरातील कवळेमठ मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्यात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मंगळवारी १७ जून २०२५) वाटप करण्यात आले. शाळेत दरमहा पालकांची सभा घ्या, त्यांची मते जाणून घ्या, असे निर्देश मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. या कार्यक्रमाला डी विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.