राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार गटाला मोठा धक्का; सांगली-साताऱ्यातील दोन नेते BJP च्या गोटात

143
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी शरद पवार गटाला मोठा धक्का; सांगली-साताऱ्यातील दोन नेते BJP च्या गोटात
  • प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन साजरा होत असतानाच शरद पवार गटाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा राजकीय धक्का बसला आहे. सांगली आणि सातारा जिल्ह्यातील दोन प्रभावी नेते, वैभव पाटील आणि सत्यजित पाटणकर यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार गटाला मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

सांगलीत वैभव पाटील यांचा भाजपा प्रवेश

सांगलीच्या विट्याचे माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते वैभव पाटील हे देखील आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. वैभव पाटील यांचा हा निर्णय शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – Mumbra Train Accident : राज्य सरकारचा मोठा निर्णय; लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी सरकारी कार्यालयांची वेळ बदलणार)

साताऱ्यात सत्यजित पाटणकर यांचा भाजपात प्रवेश

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रभावी नेते आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांनीही मंगळवारी भाजपात (BJP) प्रवेश केला. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र असलेले सत्यजित पाटणकर हे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. सत्यजित पाटणकर यांच्या भाजपा प्रवेशाचा कार्यक्रम मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडला. यावेळी सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अतुल भोसले आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

सत्यजित पाटणकर यांनी प्रवेशावेळी सांगितले की, “पाटण तालुक्यातील अनेक प्रश्न, विशेषत: व्याग्र प्रकल्पाचे पुनर्वसन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. शेतकरी आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, त्यांना ताकद मिळावी, हीच अपेक्षा आहे. भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष आहे, आणि आम्ही सर्वांनी मिळून पाटण तालुक्यात पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला आहे.”

(हेही वाचा – 11 years of Modi Government : मोदी सरकारची ११ वर्षे : भारताच्या प्रगतीची अभूतपूर्व गाथा)

उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य

सातारा लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्यजित पाटणकर यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले, “भाजपा (BJP) हा केवळ पक्ष नाही, तर एक कुटुंब आहे. अनेक वर्षांपासून सातारा जिल्ह्यात सत्तेचे केंद्रीकरण झाले होते. आता पश्चिम महाराष्ट्र कोणाचाही बालेकिल्ला राहिलेला नाही. सत्यजित पाटणकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या साथीने आम्ही संपूर्ण जिल्हा भाजपामय करू.” त्यांनी सत्यजित पाटणकर यांना ‘बच्चू दादा’ असे संबोधताना, “बच्चू दादा म्हणून डच्चू देऊ नका,” अशी मिश्किल टिप्पणीही केली.

रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन

आमदार रवींद्र चव्हाण यांनी सत्यजित पाटणकर यांना पाठिंबा देताना सांगितले, “सत्यजित पाटणकर हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात (BJP) प्रवेश केला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही. सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर सर्वांशी चर्चा करून आम्ही न्याय देऊ.”

(हेही वाचा – कोरोनाची उत्पत्ती झालेल्या चीनी लॅबमधील संशोधकाला FBI ने केली अटक; तपासणीत धक्कादायक बाब उघड)

माजी मुख्यमंत्र्यांच्या गावातील सरपंचांचाही भाजपा प्रवेश

विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावातील काही सरपंचांनीही यावेळी भाजपात (BJP) प्रवेश केला. यामुळे सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सत्यजित पाटणकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. सत्यजित पाटणकर यांचा पाटण तालुक्यातील प्रभाव आणि वैभव पाटील यांचा सांगलीतील जनसंपर्क यामुळे भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात बळ मिळेल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, शरद पवार गटाला आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी नव्याने रणनीती आखावी लागणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.