IPL 2025, RCB Champions : अखेर बंगळुरूच किंग, अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव

कृणाल पंड्याने १७ धावांत २ बळी मिळवले.

246
IPL 2025, RCB Champions : अखेर बंगळुरूच किंग, अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव
IPL 2025, RCB Champions : अखेर बंगळुरूच किंग, अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव
  • ऋजुता लुकतुके

अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची १८ वर्षांची प्रतीक्षा संपली. अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा (Punjab Kings) ६ धावांनी पराभव करत त्यांनी पहिल्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरलं. फरक फक्त ६ धावांचा दिसत असला तरी सामन्यांत बंगळुरूचं वर्चस्व कायम होतं. नरेंद्र मोदी स्टेडिअमची (Narendra Modi Stadium) खेळपट्टी आव्हानात्मक होती. आणि इथं सरस कामगिरी करणारे गोलंदाज संघाला विजय मिळवून देणार हे हळू हळू स्पष्ट होत गेलं. अशा खेळपट्टीवर १९१ ही बंगळुरूची धावसंख्या आव्हानात्मक ठरली. आणि पंजाबच्या सलामीवीरांनी चांगली कामगिरी केल्यानंतर कृणाल पंड्याने (Krunal Pandya) प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) आणि जॉश इंग्लिस (Josh Inglis) यांचे महत्त्वाचे बळी मिळवत सामना बंगळुरूच्या बाजूने झुकवला. त्याच्या ४ षटकांमध्ये पंजाबला फक्त १७ धावा करता आल्या. आणि तिथेच त्यांच्यावरील दडपण वाढलं. (IPL 2025, RCB Champions)

शिवाय धोकादायक श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) बळी रोमारिओ शेफर्डने (Romario Shepherd) मिळवला. तो अवघी एक धाव करू शकला. प्रियांश आर्य (२४), प्रभसिमरन (२६) आणि जॉश इंग्लिस (३७) या तिघांनी चांगली सुरुवात करून दिल्यानंतर बंगळुरूच्या फिरकीपटूंनी नेटाने गोलंदाजी करत बंगळुरूला विजय मिळवून दिला. श्रेयस, नेहल वढेरा आणि स्टॉयनिस यांना फारशी कमाल करून दाखवता आली नाही. आणि याला कारण, पंड्याच्या बरोबरीने भुवनेश्वर, यश दयाल आणि सुयश शर्मा यांनी मधली षटकं अगदी अचूक टाकली. आणि बळीही मिळवले. शशांक सिंगने शेवटच्या षटकात पंजाबने सामना गमावल्यानंतर तीन षटकार ठोकले. त्यामुळे जोश हेझलवूडचं पृथ:करण बिघडलं. पण, एरवी त्यानेही सुरुवातीचे दोन चेंडू निर्धाव टाकून बंगळुरूचा विजय सुनिश्चित केला. एकूणच गोलंदाजांनी बंगळुरूला विजय मिळवून दिला.

(हेही वाचा – PMRDA कडून १५० रस्त्यांसाठी जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू)

नाणेफेक जिंकून पंजाबने बंगळुरूला पहिला फलंदाजी दिली होती. फिल सॉल्ट (१६) आणि मयंक अगरवाल (२४) हे फलंदाज पॉवर प्लेमध्येच बाद झाले. तर रजत पाटिदारही २६ धावांत बाद झाला. या पडझडीत एक बाजू लावून धरलेला विराट ४३ धावांत बाद झाला तेव्हा बंगळुरू संघ २०० च्या जवळ पोहोचेल का असंच वाटत होतं. पण, बंगळुरूच्या सगळ्याच फलंदाजांनी धावसंख्येला थोडापार का होईना आकार दिला. लियम लिव्हिंगस्टोनने २४ तर जितेश शर्माने २५ धावा करत अखेर बंगळुरूला ९ बाद १९० धावांपर्यंत पोहोचवलं. गडी बाद झाले तरी बंगळुरूने धावा करणं सुरूच ठेवलं. (IPL 2025, RCB Champions)

दुसरीकडे पंजाबची मधळी फळी बंगळुरूच्या गोलंदाजांसमोर आज गडबडली. विसाव्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर बंगळुरूचा विजय स्पष्ट झाला. आणि तेव्हापासून मैदानावर खेळाडूंचा जल्लोष सुरू झाला. खासकरून विराट कोहली (Virat kohli) गेले १८ हंगाम या फ्रँचाईजीबरोबर खेळत आहे. त्यामुळे खेळाडू त्याच्याभोवती जमले आणि विराटलाही मग अश्रू अनावर झाले. बंगळुरू फ्रँचाईजीने यापूर्वी संघासाठी भरीव कामगिरी करून निवृत्त झालेल्या एबी डिव्हिलिअर्स, ख्रिस गेल अशा माजी खेळाडूंनाही आवर्जून बोलावलं होतं. आणि त्यांच्या उपस्थितीत अखेर बंगळुरूच्या खेळाडूंनी चषक उंचवला. (IPL 2025, RCB Champions)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.