कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षांपासून सांस्कृतिक विभागातर्फे दिला जाणारा ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताला २७ मे २०२५ या दिवशी वर्षा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळालेला हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू रणजित सावरकर आणि नात असिलता सावरकर-राजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्याय, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, स्मारकाचे अस्थायी विश्वस्त अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रेरणादायी इतिहासाला पुन्हा उजाळा
दोन लाख रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनातून साकारलेल्या राष्ट्रनिष्ठा, वीरश्री आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक असलेल्या गीतांना देण्यात येत आहे. संघर्षशील, तेजस्वी आणि देशभक्तीने भरलेल्या सृजनशील अभिव्यक्तीचा गौरव करण्याचा सांस्कृतिक विभागाचा हा अभिनव उपक्रम मानला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या अमर गीतास मिळालेला हा गौरव, महाराष्ट्राच्या प्रेरणादायी इतिहासाला आधुनिक संदर्भात पुन्हा उजाळा देणारा ठरला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रभूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याचा प्रारंभ वीर सावरकरांच्या ‘अनादी मी अनंत मी…’ या गीताने झाला आहे.
(हेही वाचा ‘लाल बाल पाल’मधील पंजाब, बंगाल हातून गेले आता महाराष्ट्र वाचवा; Ranjit Savarkar यांनी दिला धोक्याचा इशारा)
असे स्फुरले हे गीत
सावरकर (Veer Savarkar) पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश शासनाने अटक केली. त्यांच्यावर भरण्यात आलेला राजद्रोहाचा अभियोग इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात आणण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी (Veer Savarkar) ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेण्यासाठी आणि आपल्या देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी अथांग सागरात उडी घेतली. काही अंतर पोहून गेले सावरकरांनी मार्सेलिसचा किनारा गाठला. पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यांना बेड्यात जखडण्यात आले. इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आले. अंदमानातील यमयातनांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरुन उरले कारण तसा कवचमंत्र त्यांना त्यांच्या काव्यातून आधीच मिळाला होता आणि त्यात उफाळून आलं होतं भगवद्गीतेतील अमरत्वाचं तत्वज्ञान –
‘नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:
अच्छेद्योयम् अदाह्योयम्, अक्लेद्योशोष्य एव च’ ही भगवंताची वीरवाणी वीर विनायकाच्या मुखातून प्रकट झाली ती ‘मृत्युंजय मंत्र’ बनूनच –
‘अनादि मी अनंत मी
अवध्य मी भला
मारिल रिपु जगती असा कवण जन्मला…’
Join Our WhatsApp Community