-
ऋजुता लुकतुके
दिल्ली कॅपिटल्स संघाचं आव्हान साखळीतच आटोपल्यामुळे के. एल. राहुलला (KL Rahul) इंग्लंड दौऱ्याची तयारी करण्यासाठी थोडा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. शिवाय शेवटच्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे तो फक्त फलंदाजीसाठीच मैदानात उतरत होता. सरावादरम्यान गुडघ्यावर चेंडू बसल्यामुळे तो जपून खेळत होता. आता या दुखापतीतून सावरण्यासाठीही त्याला वेळ मिळणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलवर इंग्लंड दौऱ्यात भारताची भिस्त असणार आहे. पण, राहुलला आता तरी त्याचा फलंदाजीचा निश्चित क्रमांक मिळणार आहे का हा प्रश्न आहे.
कारण, राहुलने (KL Rahul) आतापर्यंत सातव्या क्रमांकापासून ते अव्वल क्रमांकापर्यंत सगळीकडे फलंदाजी केली आहे. याबद्दल आपल्याकडे कधीच पर्याय नव्हता, असं राहुल म्हणतो. ‘माझी आतापर्यंतची कारकीर्द पाहिलीत तर माझ्याकडे फारसा पर्यायही नव्हता. मी, मला जिथे संधी मिळाली, त्याप्रमाणे फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय मी असा खेळाडू नाही, जो निवड समिती सदस्यांशी नियमितपणे बोलेन, कप्तानाशी जवळीक वाढवेन आणि मला काय करायचंय ते मी त्याला सांगेन. त्यामुळे आलेल्या गोष्टी मी स्वीकारत गेलो,’ असं राहुल म्हणाला.
(हेही वाचा – IPL 2025 Point Table : पंजाब पहिल्या दोन संघांत तर मुंबई चौथी, बंगळुरूला पहिल्या दोनांत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल?)
संघात कायम राहायचंय आणि संघाला गरज असेल तशी भूमिका बजावायची हाच के. एल. राहुलचा (KL Rahul) मंत्र आहे. आधीच्या दोन मालिकांमध्ये भारताची कामगिरी चांगली व्हायला हवी होती, असंही राहुलला वाटतं. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणतो, ‘शेवटच्या दोन कसोटी मालिकांमध्ये भारताची कामगिरी चांगली व्हायला हवी होती. त्यानंतर सगळा खेळच पालटला. घरच्या मैदानात न्यूझीलंडशी झालेल्या पराभवामुळे समीकरणं बदलली. महत्त्वाचं म्हणजे फलंदाजांची कामगिरी चांगली झाली नाही. त्याचा फटका बसला. आम्हाला त्यांनी मनाप्रमाणे फलंदाजी करू दिली नाही,’ असं राहुल या मालिकेविषयी म्हणतो.
भारताचा न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर ०-३ असा पराभव झाला. त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात १-४ असा पराभव भारतीय संघाला स्वीकारावा लागला. यामुळे कसोटी अजिंक्यपदाचं भारताचं स्वप्न तर भंगलंच. शिवाय भारताची फलंदाजीची घडी अजूनही बिघडलेलीच आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांनी निवृत्ती स्वीकारली. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ आता नवख्या खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community