-
प्रतिनिधी
फौजदारी न्यायव्यवस्थेतील महिला, मुले आणि तरुणांच्या पुनर्वसनासाठी ‘प्रयास’ उपक्रमाने महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये (Jail) सकारात्मक क्रांती घडवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून टाटा सामाजिक विज्ञान संस्था (TISS) व कारागृह विभागाच्या संयुक्त विद्यमाने 2016 पासून राबवला जात असलेला हा प्रकल्प आता आणखी तीन वर्षांसाठी विस्तारण्यात आला आहे. आतापर्यंत 16,994 बंदींपर्यंत ‘प्रयास’ चा थेट स्पर्श पोहोचला आहे.
सामंजस्य कराराने सुरू झालेली आशेची वाटचाल
ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि येरवडा या पाच मध्यवर्ती कारागृहांमध्ये (Jail) तसेच नाशिकच्या ब्रोस्टल स्कूलमध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पासाठी 13 प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्ते कार्यरत आहेत. पुरुष व महिला समाजसेवक विविध कारागृहांमध्ये (Jail) बंद्यांसोबत थेट संवाद साधत कायदेशीर, मानसिक, वैद्यकीय आणि सामाजिक स्तरावर मदतीचा हात पुढे करत आहेत.
(हेही वाचा – भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा आदेश)
मुल्याधारित उद्दिष्टांसाठी सातत्यपूर्ण कार्य
प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट बंद्यांचे पुनर्वसन, तुरुंग व्यवस्थेत समाजसेवकांना संस्थात्मक आधार देणे, मानसिक स्थैर्यासाठी मदत करणे आणि प्रशासकीय सुसूत्रता साधणे हे आहे. बंदींच्या विनंतीनुसार आणि अधिकाऱ्यांच्या संमतीने समुपदेशन, कायदेशीर साहाय्य, आरोग्य सेवा, प्रशिक्षण, गृहोपचार, गृहभेटी आणि न्यायालयीन पाठपुरावा यांसारख्या सेवा पुरविल्या जातात.
मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचलेले समुपदेशन
प्रकल्पाद्वारे 12,588 बंद्यांचे समुपदेशन करण्यात आले. मानसिक अडचणी, कौटुंबिक समस्या, वैद्यकीय गरजा, जामिनासंबंधी चिंता अशा अनेक पातळ्यांवरील प्रश्नांवर व्यक्तिशः संवाद साधून योग्य उपाय दिले गेले. कोरोना काळात फोनद्वारे 37,802 वेळा संपर्क साधण्यात आला.
(हेही वाचा – Mahim Building Collapse: मुंबईत जोरदार पाऊस; माहीममध्ये इमारतीचा भाग कोसळला)
गृहभेटी आणि कुटुंबीयांसोबत संवादाची नव्याने उभारणी
बंद्यांच्या कुटुंबीयांना गृहभेटीमधून मानसिक आधार देणे, जामिनासाठी प्रयत्न, रेशन किंवा प्रवासखर्चाची मदत, मुलांसाठी बाल संगोपन योजना, अशा अनेक सेवा दिल्या जात आहेत. आतापर्यंत 1,042 बंद्यांच्या घरी समाजसेवकांनी भेटी दिल्या. विशेषतः लॉकडाऊन काळात मुलाखती बंद असताना 2,845 गळाभेटींचे आयोजन करण्यात आले.
कायदेशीर मदतीसाठी प्रभावी पावले
या उपक्रमात 16,691 कायदेशीर मार्गदर्शनप्रकरणे हाताळली गेली असून, 42 कायदेविषयक शिबिरांमधून 10,645 बंद्यांनी सहभाग घेतला. याशिवाय, 2,317 वकील भेटी, 2,045 न्यायालय भेटी, आणि 1,122 वैयक्तिक जामिनासाठी प्रयत्न नोंदवले गेले.
(हेही वाचा – Dr. Bhushan Gagrani यांचा नगरविकास खात्यातील अनुभव लागणार सार्थकी, मुंबई महापालिकेला होणार ‘असा’ नफा)
मानसिक आरोग्यासाठी विशेष उपचार आणि रेफरल प्रणाली
उदासी, चिंता, व्यसनसंबंधी समस्या असलेल्या बंद्यांसाठी तपासणी व समुपदेशन केले जाते. गंभीर प्रकरणे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिबिरांत किंवा रुग्णालयात रेफर केली जातात. दरमहा अशी शिबिरे आयोजित केली जातात.
सकारात्मक बदलाच्या दिशेने ‘प्रयास’
‘प्रयास’ हा प्रकल्प केवळ बंद्यांचे पुनर्वसन नव्हे, तर त्यांच्या आत्मविश्वासाचा पुनर्जन्म आहे. शिक्षेच्या भिंतीपलीकडेही जीवन आहे, ही जाणीव देणारा आणि समाजाला पुनःस्वीकारण्यास तयार करणारा एक मानवी आणि व्यावसायिक दृष्टिकोन आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community