BMC Election : मुंबईचा विकास आता पालकमंत्र्यांच्या शिफारशीने; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तुलनेत शेलारांनी मारली बाजी

193
BMC Election : मुंबईचा विकास आता पालकमंत्र्यांच्या शिफारशीने; उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या तुलनेत शेलारांनी मारली बाजी
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडल्याने सध्या प्रशासक नियुक्त असल्याने पालकमंत्र्यांच्या मंजुरीने आमदार आणि खासदारांना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यापूर्वी ३५ कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर आता प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी सुमारे साडे सतरा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जात असून यामध्ये शहराचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बाजी मारल्याचे पहायला मिळत आहे. शहरातील आमदार आणि खासदारांच्या माध्ममातून महापालिकेला एकही प्रस्ताव पालकमंत्र्यांकडून सादर करण्यात आला नसून त्यातुलनेत शेलार यांच्याकडून अनेक प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (BMC Election)

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा घेतला समाचार; म्हणाले, काँग्रेसच्या डोक्यात पाकिस्तानी व्हायरस…)

मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक नियुक्त असल्याने मुंबईतील विकासकामांना गती मिळावी म्हणून शहर व उपनगरांचे पालकमंत्री यांच्या शिफारशीनुसार विकासकामांसाठी आमदारांना निधी उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक प्रशासनाच्यावतीने काढण्यात आले. या परिपत्रकानुसार तत्कालिन शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सहा आमदारांच्या विकास कामांच्या निधीकरता आणि उपनगराचे तत्कालिन पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी १० आमदारांच्या विकासकामांच्या निधीकरता शिफारस केली होती. ३६ पैंकी २१ आमदारांच्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यासर्व २१ आमदारांना आतापर्यंत ५७० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्रत्येक आमदार आणि खासदाराला त्यांच्या विभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी ३५ कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध करून देण्यात आला होता आणि विकासकामांच्या मंजुरीने या निधीला वाटपाला मंजुरी देण्यात येत होती. (BMC Election)

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने शौर्य, विज्ञान आणि स्मृतिचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन)

मागील आर्थिक वर्षात प्रत्येक आमदार आणि खासदार यांच्यासाठी प्रत्येकी ३५ कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली होती. त्यासाठी एकूण ९०० कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या अर्थसंकल्पात केली होती. त्यानंतरच्या आर्थिक वर्षांत पालकमंत्र्यांच्या मंजुरीने निधी वाटप करण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील आणि खासदार यांना प्रत्येकी १५ कोटी रुपये एवढ्या निधीचीत तरतुद विकास कामांसाठी करण्याच्या निर्णय घेतला होता आणि त्यासाठी एकूण ५४० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. परंतु आता सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षांसाठी सुरुवातीला यासाठी कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार नाही असे बोलले जात असताना प्रत्यक्षात प्रत्येकी १७.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे ७३६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत उपनगराचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्याकडे आलेल्या विकासकामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे सादर केले आहेत, तर शहराचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मात्र एकही प्रस्ताव सादर केलेला नाही. मात्र, आता उपमुख्यमंत्र्यांनी शहरातील लोकप्रतिनिधींना निर्देश देत आपले प्रस्ताव सादर केले जावेत असे निर्देश दिल्याची माहिती मिळत आहे. (BMC Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.