
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी, फोंडा येथे पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त शिवकालीन ऐतिहासिक आणि दुर्मिळ शस्त्रांचे भव्य प्रदर्शन धर्मप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरले. ६ हजार चौरसफुट क्षेत्रात मांडण्यात आलेल्या या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे सजीव चित्र उभे केले. ३० हजारांहून अधिक धर्मप्रेमी नागरिक, तसेच संत, महंत आणि आध्यात्मिक मार्गदर्शकांच्या उपस्थितीत झालेल्या या महोत्सवात शिवकालीन शौर्य, पराक्रम आणि बलिदान यांची आठवण प्रत्येकाच्या मनात ठसठशीतपणे कोरली गेली. (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav)
प्रदर्शनात कोल्हापूरच्या सव्यासाची गुरुकुलम आणि पुण्याच्या शिवाई संस्थान यांचे शस्त्रप्रदर्शन, गोव्यातील सौंदेकर घराण्याची प्राचीन शस्त्रे, तसेच सरदार येसाजी कंक यांची तलवार आणि सरदार कान्होजी जेधे यांचे चिलखत प्रमुख आकर्षण ठरले. त्यात सर्वात हृदयस्पर्शी ठरले ते छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने बंदिस्त करताना वापरलेले मूळ साखळदंड, जे शिवले कुटुंबाने पिढ्यान्पिढ्या जतन केले आहेत. या साखळदंडांचे प्रथमच सार्वजनिक दर्शन याच महोत्सवात झाले. (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav)
(हेही वाचा – IPL 2025, MI vs DC : अक्षर पटेल मुंबईविरुद्ध का खेळला नाही?)
या प्रसंगी शिवले कुटुंबातील वंशज सर्वश्री सागर शिवले, कुमार शिवले, सोमनाथ शिवले, दीपक टाकळकर आणि वेदांत शिवले यांचा हिंदु जनजागृती समितीचे पूर्वाेत्तर भारताचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी कुमार शिवले म्हणाले, “राजांच्या बलिदानातून प्रेरणा घेऊन समाजात धर्मप्रेम जागवण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.” (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav)
प्रदर्शनात शिवकालीन युद्धकलेत वापरण्यात येणारी दुर्मिळ शस्त्रे : विविध प्रकारच्या तलवारी, बंदुका, ढाली, जांबिया, तोफा, कट्यारी, चिलखत, शिरस्त्राण, भाले, कुर्हाडी, त्रिशूल, अंकुश, सिकल, पुरबा इत्यादींचे प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय छत्रपतींच्या सैन्यातील सरदारांची सचित्र पराक्रमाची माहितीही उपस्थितांना इतिहासाचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी ठरली. (Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community