राज्य सरकारने बुधवारी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले. पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००८ च्या तुकडीचे अधिकारी (IAS) नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांची बदली मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
चंद्रकांत डांगे यांची मंत्रालयात मुख्य सचिवांच्या कार्यालयात सहसचिव पदावर बदली झाली आहे. तर क्रीडा आणि युवक विभागाच्या आयुक्त म्हणून शीतल तेली – उगले यांची नेमणूक झाली आहे. धुळ्याचे जिल्हाधिकारी जे. एस. पापळकर यांची छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. सिडको, छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी (IAS) भाग्यश्री विसपुते यांची नियुक्ती धुळे जिल्हाधिकारी या पदावर झाली आहे.
अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख विभाग पुणे येथील अतिरिक्त संचालक आनंद भंडारी यांची वर्णी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लागली आहे. तर अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर यांची बदली अमरावतीचे जिल्हाधिकारी (IAS) म्हणून झाली आहे.
Join Our WhatsApp Community