Operation Sindoor : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारतीय सेनेच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वी कारवाईनंतर लष्कराच्या सन्मानार्थ मुंबईत आयोजित भव्य तिरंगा यात्रेत सहभाग घेतला. ऑगस्ट क्रांती मैदानापासून गिरगाव चौपाटीपर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेत हजारो नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला. या प्रसंगी फडणवीस यांनी भारतीय सेनेच्या (Indian Army) पराक्रमाचे कौतुक करताना पाकिस्तानला इशारा दिला की, भारताची संरक्षण यंत्रणा अजेय आहे. (Operation Sindoor)
फडणवीस म्हणाले, “पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दहशतवादाचे कंबरडे मोडले. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, या ऑपरेशनमुळे भारताचे लष्करी सामर्थ्य जगाला दिसून आले आणि पाकिस्तानला भारतापुढे गुडघे टेकावे लागले.
यात्रेच्या प्रारंभी फडणवीस यांनी ऑगस्ट क्रांती मैदानातील गांधी स्मृती स्तंभ ‘क्रांती स्तंभा’ला पुष्पचक्र अर्पण केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. यात्रेचा समारोप गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण आणि टिळक स्मारकाला अभिवादन करून झाला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लष्कराच्या शौर्याला सलाम केला. ते म्हणाले, “पाकिस्तानने गोळी चालवली तर भारत तोफ आणि गोळ्यांनी उत्तर देईल.” याशिवाय, मंत्री मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, पंकजा मुंडे, आमदार रविंद्र चव्हाण, माजी सैनिक आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. या यात्रेने मुंबईकरांमध्ये देशभक्तीचा उत्साह संचारला असून, भारतीय सेनेच्या पराक्रमाविषयी अभिमान व्यक्त केला गेला.