-
प्रतिनिधी
मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या (J. J. Hospital) सुपर स्पेशालिटी इमारतीचे काम तातडीने आणि गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत. या प्रकल्पामुळे रुग्णांना कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी यासारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, विशेषत: गरजू रुग्णांना याचा मोठा लाभ होईल. ऑक्टोबर 2025 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मिसाळ यांनी जे. जे. (J. J. Hospital) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला भेट देऊन सविस्तर पाहणी केली आणि आढावा बैठक घेतली. यावेळी त्या म्हणाल्या, “सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीला गती द्यावी. यामुळे रुग्णांना सर्व वैद्यकीय सेवा एकाच छताखाली मिळतील आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.” बैठकीला सचिव धीरज कुमार, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – Novak Djokovic : सहा महिन्यांतच नोवाक जोकोविच आणि अँडी मरे यांची जोडी फुटली)
विभागांची पाहणी आणि सुविधांचा आढावा
मिसाळ यांनी रुग्णालयातील (J. J. Hospital) कार्डिओलॉजी, न्यूरोसर्जरी, जनरल सर्जरी, अतिदक्षता विभाग (ICU) आणि नर्सिंग होम यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक उपकरणांची माहिती घेतली आणि त्यांच्या कार्यक्षमतेची खात्री केली. तसेच, रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी, रिक्त पदांची भरती, डॉक्टरांसाठी वसतिगृह सुविधा, अन्न गुणवत्ता, स्कॅनिंग सुविधा, ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व बाबींची त्वरित अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
वैद्यकीय शिक्षणावर विशेष भर
मिसाळ यांनी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. “बदलत्या काळानुसार वैद्यकीय शिक्षणातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा आणि उत्तम प्रशिक्षण मिळाले पाहिजे,” असे त्या म्हणाल्या. यासाठी रुग्णालयात आवश्यक सुधारणा आणि पायाभूत सुविधा वाढवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
(हेही वाचा – Operation Sindoor : रिझवान कुरेशीची फेसबुक पोस्ट अन् जमावाकडून बेदम मारहाण, पश्चिम बंगालमधील नेमकं प्रकरण काय?)
जे. जे. रुग्णालयाची ऐतिहासिक परंपरा
180 वर्षांची समृद्ध परंपरा असलेले जे. जे. रुग्णालय (J. J. Hospital) हे देशातील एक प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थान आहे. नुकतेच या रुग्णालयाला ‘बेस्ट इंटरनॅशनल व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सुपर स्पेशालिटी प्रकल्पाला गती देणे हे रुग्णालयाच्या विकासासाठी आणि रुग्णसेवेसाठी महत्त्वाचे पाऊल आहे.
वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश
मिसाळ यांनी सुपर स्पेशालिटी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यावर विशेष भर दिला. “हा प्रकल्प रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. ऑक्टोबर 2025 पर्यंत सर्व काम पूर्ण होईल, यासाठी सर्वांनी समन्वयाने आणि गतीने काम करावे,” असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यामुळे रुग्णालयाची क्षमता आणि सेवा गुणवत्ता वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जे. जे. रुग्णालयाच्या (J. J. Hospital) सुपर स्पेशालिटी इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊन रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतात का, याकडे मुंबईकरांचे आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे. मिसाळ यांच्या या भेटीमुळे प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community