BMC : मरोळमध्ये साडेतीन एकर वन वाढले…

51
BMC : मरोळमध्ये साडेतीन एकर वन वाढले...
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिका आणि मरोळ इंडस्ट्रियल इस्टेटच्या सहकार्याने ३.५ एकर क्षेत्रात नागरी वन विकसित करण्यात आले आहे. विविध प्रजातीच्या १० हजार झाडांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. या परिसरातील मलनिस्सारण प्रकल्पातून नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ केलेल्या पाण्याचा वापर वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी करण्यात येत आहे. मुंबईतील हा पहिला पर्यावरणपूरक मलनिस्सारण प्रकल्प आहे. (BMC)

मरोळ मधील महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी नागरी उद्यानाचे लोकार्पण रविवारी ११ मे २०२५ रोजी राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते पार पडले. या नागरी वनाच्या लोकार्पणप्रसंगी स्थानिक आमदार मुरजी पटेल, उपआयुक्त (शिक्षण) तथा संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते. (BMC)

(हेही वाचा – Pakistan च्या गुप्तचर संघटनेची कुरघोडी, भारताच्या व्हॉटस्अप नंबरवरून मिळवतात संवेदनशील माहिती)

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन निधीतून या उद्यानाचा विकास अतिशय नाविण्यपूर्ण पद्धतीने करण्यात आला आहे. अवघ्या १ वर्षांच्या कालावधीत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. संपूर्ण प्रकल्प अंतर्गत देशी पप्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये, बांबू, बकूळ, आंबा अशा विविध प्रजातीच्या १० हजार झाडांची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीमुळे वर्षभरात या परिसरातील तापमानात २ अंश सेल्सिअसने घट नोंदवण्यात आली असल्याचे एका अभ्यास अहवालातून स्पष्ट झाले आहे. (BMC)

याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी सुविधा, मनोरंजनासाठी विशेष जागा, स्वच्छतागृह, प्रदर्शनासाठी जागा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मरोळ इंडस्ट्रियल इस्टेट, वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिटय़ूट यासारख्या विविध संस्थांच्या माध्यमातून या उद्यानातील विविध नावीन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्यात आल्या आहेत. मरोळ सागबाग येथील या उद्यानाच्या विकासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन विभागाने विविध संस्थाच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न केले आहेत. (BMC)

(हेही वाचा – Rise in SIP : एप्रिल महिन्यात २६,६३२ कोटींच्या एसआयपी, खात्यांची संख्या ८.३८ कोटींवर)

मुंबईतील नागरिकांच्या सहभागाने येत्या काळात अधिकाधिक नागरी वनाच्या संकल्पनेवर आधारित उद्यानांचा विकास करण्यासाठी भर द्यायला हवा. ज्यामुळे पुढील पाच वर्षात मुंबई सारख्या नागरी भागातील तापमान किमान तीन ते चार डिग्री सेल्सिअसने कमी होण्यासाठी मदत होईल. मुंबईत मध्यवर्ती भागात संयुक्त प्रयत्न केल्याने एक आदर्श उद्यान कसे विकसित होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे मरोळ येथील महातपस्वी आचार्य श्री महाश्रमणजी उद्यान होय, असे गौरवोद्गार मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी काढले. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.