पाकिस्तानच्या लष्कर अधिकाऱ्यांनी मागितला लष्करप्रमुख Asim Munir यांचा राजीनामा; पाकचे लष्कर बुडाले सत्ता संघर्षात
पाकिस्तानी लष्करातील एका गटाने - ज्यामध्ये कर्नल, मेजर आणि कॅप्टनसह वरिष्ठ आणि मध्यम दर्जाचे अधिकारी समाविष्ट आहेत, त्या सर्वांनी जनरल मुनीर यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करणारे कडक शब्दात पत्र जारी केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्तानंतर इस्लामाबादमधील राजकीय वातावरण अधिक अनिश्चिततेत गेले आहे. पाकिस्तानी लष्कर किंवा संघराज्य सरकारकडून अधिकृत पुष्टी मिळालेली नसली तरी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याविषयी चर्चा सुरु झाली आहे. ज्यामुळे पाकिस्तानला लष्कराच्या अंतर्गत सत्ता संघर्षाची चिंता वाढली आहे. पाकिस्तानी लष्करातील एका गटाने – ज्यामध्ये कर्नल, मेजर आणि कॅप्टनसह वरिष्ठ आणि मध्यम दर्जाचे अधिकारी समाविष्ट आहेत, त्या सर्वांनी जनरल मुनीर यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करणारे कडक शब्दात पत्र जारी केले आहे.
या पत्रात लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) वर लष्कराचे राजकारण करणे, लोकशाही प्रक्रियांना कमकुवत करणे, प्रेस स्वातंत्र्य दडपण्याचा आणि देशातील राजकीय आणि आर्थिक संकटांना चालना देण्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लेफ्टनंट जनरल साहिर शमशाद मिर्झा यांना जनरल असीम मुनीर (Asim Munir) यांच्या जागी नियुक्त करण्याचा विचार केला जात असल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र याची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. पाकिस्तान सशस्त्र दलांची अधिकृत मीडिया शाखा असलेल्या इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने अद्याप या अफवांबद्दल किंवा कथित पत्राबद्दल कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान पाकिस्तानच्या लष्करी आस्थापनेतील जॉइंट चीप ऑफ स्टाफ कमिटी (सीजेसीएससी) चे अध्यक्ष जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना अटक केल्याचे वृत्त आहे.