-
प्रा. डॉ. प्रकाश खांडगे
लोकसंस्कृती ही अव्यक्त संकल्पना असली, तरी तिचे कृती-रूप व्यक्तरूप लोककलांमध्ये सामावलेले असते. लोककलांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, एक दृक लोककला आणि दुसऱ्या प्रयोगात्मक लोककला. दृक लोककलांमध्ये हस्तकला, शिल्पकला, मंदिर परिसरातील शिल्पचित्रे, जात्यावरील चित्रे, काष्ठ-शिल्प, अंगणातल्या तुळशी वृंदावनाभोवतीच्या रांगोळ्या, नागपंचमीच्या दिवशी भिंतीवर लावलेली जीवतीची चित्रे, वारली समाजाची तांदळाच्या पिठीची चित्रे… आदींचा समावेश होतो. तर प्रयोगात्मक लोककलांमध्ये नृत्य-नाट्य-संगीतमय प्रयोगरूप कलाविष्कारांचा समावेश होतो. ज्यामध्ये लोककथा, लोकगीते, लोकनाट्य, विधिनाट्य, भक्तीनाट्य, प्रहेलिका, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, जात्यावरची गीते आदींचा समावेश होतो. थोडक्यात प्रयोगात्मक लोककला म्हणजे समूहमनाचा प्रकट आविष्कार. लोकांनी लोकांसाठी लोकांमधून निर्माण केलेल्या कला म्हणजेच लोककला. लोककला म्हणजे समष्टीची निर्मिती. लोककला या एकाच वेळी वैश्विक आणि व्यक्तिनिष्ठ असतात. स्थळ-काळ-व्यक्ती सापेक्ष असतात. लोककला म्हणजे व्यक्तीचा किंवा व्यक्तींचा हृदयसंवाद. या हृदयसंवादाला संत ज्ञानेश्वरांनी ‘तुझिये जीविचे माझिये जीवि पडो’, असे म्हटले आहे. तर खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांनी या परस्पर लोकसंवादाला ‘हिरिताचं देणधेणं’ असं म्हटलं आहे. एकूणच समष्टीचा परस्परांशी कलात्मक संवाद प्रयोगात्मक लोककलांमधून शक्य होतो. या लोककलांची निर्मिती मानवी संस्कृतीच्या विकासासोबत झालेली आहे. किंबहुना संस्कृतीच्या विकासाचे प्रतिबिंब म्हणजे या लोककला होत. लोककलांचे विधीप्रधान लोककला, भक्तीप्रधान लोककला, समाज प्रबोधनपर लोककला, रंजनप्रधान लोककला असे मुख्य भेद आहेत. लोककला या एकाच वेळी सार्वकालिक आणि विशिष्ट कालिक असतात. (Maharashtra Day)
हिंदुस्तानचे राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रधर्म प्रामुख्याने लोकसंस्कृतीच्या लोकधर्मामध्ये सामावलेले आहे. मानवी विकासाच्या इतिहासासोबत लोककलांची प्रगती झाली. ज्या वेळी आपण वनसंस्कृतीमध्ये होतो, तेव्हा ध्वनी आणि नादासह परस्परांशी संवाद साधत होतो. ध्वनीला शब्द आणि अर्थाचे संकेत नंतर प्राप्त झाले. वनसंस्कृतीतून आपण क्षेत्रसंस्कृतीत म्हणजे कृषी संस्कृतीत आलो, त्या वेळी क्षेत्रपाळ देवता आल्या. या क्षेत्रपाळ देवता आपली पिके, आपली धरती, आपली झाडे-झुडपे, आपली जनावरे यांचे रक्षण करीत असत. म्हणून या क्षेत्रपाळ देवतांची आपण सकाम भक्तीची पूजा बांधली. या क्षेत्रपाळ देवता प्रामुख्याने शिव आणि शक्ती कुळातील होत्या. जेव्हा आपण कृषी संस्कृतीतून ग्राम संस्कृतीत आलो त्या वेळी राम-कृष्ण-विठ्ठल आशा विष्णूकुळातील देवतांची पूजा आपण करू लागलो. त्यांची मंदिरे आली. लोकदैवतांबरोबर कुलदेवता-ग्रामदेवता आल्या. त्यांचे उत्सव सुरू झाले. या उत्सवात विविध लोककला सादर होऊ लागल्या. समाजाचे मंडळीकरण वाढले. समाजाचा एकोपा वाढला. समाजाचे सौहार्द वाढले. (Maharashtra Day)
(हेही वाचा – १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल महाराष्ट्र दिनी जाहीर होणार; CM Devendra Fadnavis यांची माहिती)
तमाशा, खडीगंमत, संगीत बारी, हे रंजनप्रधान लोककलाप्रकार महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय आहेत. कारण या लोककला प्रकारांनी प्रेक्षकांच्या मागणीनुसार आपल्या स्वरूपामध्ये बरावाईट बदल केला. बऱ्या बदलापेक्षा प्रेक्षकांना शरण जाणारा उथळ बदलच अधिक प्रमाणात केला. त्यामुळे या कला प्रकारांची लोकप्रियता आजही टिकून आहे. पण त्यांचे मूळचे पारंपरिक स्वरूप आज दृष्टीस पडत नाही. दत्तोबा तांबे शिरोलीकर, दत्ता महाडिक पुणेकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, विठाबाई नारायणगावकर, हरिभाऊ अनविकर, अशा अनेक तमाशा कलावंतांनी तमाशा वग लोकप्रिय केले. हे वग प्रामुख्याने पौराणिक, रजवाडी, ऐतिहासिक, सामाजिक अशा स्वरूपाचे होते. गोंधळ, जागरण, भराड हे कुळधर्म-कुळाचार लग्न-मुंजीच्या प्रसंगी अलीकडेही सुरू आहेत. पण त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कीर्तन, तमाशा, लावणी, यांसारख्या लोकप्रिय लोककलांसोबत महाराष्ट्रात काही दुर्मिळ लोककलांची स्वतंत्र परंपरा आहे. या दुर्मिळ लोककला अमूर्त सांस्कृतिक ठेवा म्हणून कालांतराने मान्यता पावू शकतात. कळसुत्री बाहुल्या, चित्रकथी परंपरा, पैठण आणि कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी या जागी होत्या. आता पिंगुळीमध्ये ठाकर समाजातील मसगे आणि गंगावणे ही दोनच घराणी या परंपरा पुढे नेत आहेत. पैठणी शैली अस्तंगत झाली आहे. तमाल वृक्षाच्या पानांवर रामायण-महाभारत आणि पुराणातील कथांवर नैसर्गिक रंगासह चित्रे काढून ती खुडूक वीणा, पखवाज या वाद्यांच्या साथीने गाऊन निरूपण रूपाने सादर करण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा. तसेच लाकडाच्या अथवा चामड्याच्या देवदेवतांच्या बाहुल्या तयार करून त्यांना सूत्रे बांधून त्या सूत्राद्वारे हलवत ठेवीत कथा सादर करण्याची परंपरा म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचे खेळ. ही लोककला सादर करणाऱ्या कलावंतांना बाहुलेकर असे म्हणतात. (Maharashtra Day)
शारदीय आणि वासंतिक नवरात्रात हे खेळ कोकणात मंदिरात सादर होतात. भक्ती संप्रदायातील लळित या भक्ती नाट्याची परंपरा देखील अलीकडच्या काळामध्ये अस्तंगत होत चालली आहे. मराठवाड्यात अंबेजोगाई, जालना या परिसरात लळिताची परंपरा अद्याप कायम आहे. अंबेजोगाई येथील लळित दासोपंतांचे लळीत म्हणून प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथील रामानंदांचे लळित प्रसिद्ध आहे. सांगली येथे गणपती मंदिरात पूर्वी लळित सादर होत असे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील आर्वी जवळचे पिंपळगाव आणि त्याच तालुक्यातील उंब्रज या गावी वारकरी संप्रदायाचे लळित सादर होत असे. मात्र ही परंपरा आता अस्तंगत होत चालली आहे. तळकोकण आणि गोव्याच्या सीमेवर लळिताचे कार्यक्रम नारदीय कीर्तनाच्या वेळी सादर होत असत. अद्याप क्षीण स्वरूपात का होईना, ही परंपरा कायम आहे. लोककला एकेकाळी जीवनाचे अविभाज्य अंग होत्या. विधी विधाने आणि धर्म यांचे वहनाचे साधन होत्या, त्या आज बदलल्या आहेत समाज प्रबोधन आणि रंजन हे हेतू या लोककलांना संलग्न झाले आहेत. बदलत्या संदर्भांमुळे लोककलांची निकड हळूहळू कमी होत आहे. अलीकडच्या काळात त्या विविध संदेशांचे वहन करणारी माध्यमे म्हणून उदयास आलेली आहेत. त्यामुळे अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांच्या पुनरुत्थानाचा वेगळा विचार करावा लागेल हा विचार समष्टीनिष्ठ असला, तरी त्याचा व्यक्ती हा केंद्रबिंदू आपल्याला विसरता येणार नाही. शेवटी मन्वंतर घडविण्याची शक्ती या कलांमध्ये आहे. चंद्र-सूर्य असेपर्यंत या कला कायम राहतील आणि तुमचे आमचे आध्यात्मिक उद्बोधन सामाजिक प्रबोधन आणि रंजन करीत राहतील. (Maharashtra Day)
(लेखक लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community