-
शितल सूरज ढोली
छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत प्रभावी आणि वैशिष्ट्यपूर्ण युद्धकला विकसित केली. मावळ्यांना त्या कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन पारंगत केले. मराठा सैन्यामध्ये तलवार, भाला, कुऱ्हाड, विटा, दांडपट्टा, लाठी-काठी काही प्रमाणात धनुष्यबाण यांसारख्या विविध शस्त्रांचा वापर केला जात होता. शिवकालीन युद्धकला शत्रूंना चकित करणारी व धडकी भरवणारी होती. छत्रपतींची ही युद्धकला ‘मर्दानी खेळ’ केवळ त्यांच्या काळातच नव्हे, तर आज ४०० वर्षे होत आली, तरी जिवंत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत युद्धकला प्रशिक्षण संस्था, वस्ताद कै. सूरज ढोली संस्थापित शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचामार्फत हे शिवकार्य गेली २५ वर्षे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मर्दानी खेळाचा प्रचार आणि प्रसार करुन अखंडपणे करत आहेत. अनेक राष्ट्रीय रेकॉर्ड व इतर पुरस्कार संस्थेच्या नावावर आहेत. (Maharashtra Day)
(हेही वाचा – CC Road : मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्तांना उशिरा सुचले शहाणपण; सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामात केल्या ‘या’ सूचना)
स्वरक्षणाचे सामर्थ्य देणारी युद्धकला
राजमाता जिजाऊसाहेब, रणरागिणी महाराणी ताराराणी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या थोर महिलाही या युद्धकलेमध्ये पारंगत होत्या. स्वराज्यासाठी त्यांनी कौशल्यपूर्ण लढाया करून शत्रूचा पराभव केल्याचे सर्वांना ज्ञात आहे. मर्दानी खेळ ही महाराष्ट्राची शौर्यपरंपरा आहे. या खेळाचे शिक्षण आजच्या काळातही महिलांनी आत्मसात करणे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. आज-काल महिलांवरील अत्याचार, गुन्हेगारी वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत मर्दानी खेळांतून त्यांना शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य मिळून स्वतःचे रक्षण करण्याचे बळ मिळते. (Maharashtra Day)
सामाजिक सक्षमीकरण
भाला, लाठी-काठी, तलवार, दांडपट्टा, विटा अशा विविध पारंपरिक शस्त्रांचे प्रशिक्षण त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करते. धोक्याच्या वेळी प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करते. ही निव्वळ लढण्याची कला नाही, तर हा एक उत्कृष्ट व्यायामप्रकार आहे. यामुळे शारीरिक तंदुरुस्ती, चपळता समन्वय आणि सहनशक्ती वाढते. त्याचबरोबर एकाग्रता, आत्मविश्वास आणि मानसिक कणखरता विकसित होते. मर्दानी खेळांचे प्रशिक्षण सामूहिक स्तरावर दिले जाते. त्यामुळे महिलांना एकत्र येण्याची, एकमेकांना मदत करण्याची, सामाजिक संबंध वाढवण्याची संधी मिळते. शारीरिक क्षमता आणि शौर्य केवळ पुरुषांची मक्तेदारी नाही, हे या खेळांमुळे सिद्ध होते. मर्दानी खेळांमुळे त्यांचे सामाजिक सक्षमीकरण होऊन समाजात स्थान निर्माण होते. एखादी महिला मर्दानी खेळात प्राविण्य मिळवते, तेव्हा इतर महिलांसाठी प्रेरणास्त्रोत ठरते. शौर्याची आणि धैर्याची इतर महिलांना प्रेरणा देते. शिवकालीन युद्धकला ‘मर्दानी खेळ’ आज महिलांसाठी केवळ आत्मसुरक्षेचे साधन नाही, तर शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच पारंपरिक वारसा जतन करण्याचे प्रभावी माध्यम ठरेल. आजच्या काळात महिलांनी मर्दानी खेळ आत्मसात करणे, ही काळाची गरज आहे. (Maharashtra Day)
(लेखिका कोल्हापूर येथील शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचाच्या अध्यक्षा आहेत.)
Join Our WhatsApp Community