Maharashtra Day : महाराष्ट्राचे वैभव : छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले

106
Maharashtra Day : महाराष्ट्राचे वैभव : छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले
  • डॉ. श्रमिक गोजमगुंडे

छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य ज्या भागात प्रामुख्याने निर्माण झाले, तो भाग सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांनी विखुरलेला. यावर उभे असलेल्या गड-कोटांच्या सहाय्याने शिवरायांनी अभूतपूर्व असा लढा दिला व यात यश मिळून स्वराज्य उभे राहिले. शिवरायांच्या अगोदर पण गडकोट होतेच, पण खऱ्या अर्थाने त्यास महत्व दिलं ते शिवरायांनी. तोरणा गड जिंकूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ शिवरायांनी केली. येथे मोठा खजाना सापडला व त्याचा उपयोग समोरील असणाऱ्या मुरुबदेवाच्या डोंगरावर गड बांधून त्याचे नाव राजगड ठेवले. गडांची एक साखळीच निर्माण केली. देशावर तसेच समुद्रावर किल्ले बांधले. आज्ञापत्र या रामचंद्र अमात्य यांच्या ग्रंथात आपल्याला याची सविस्तर माहिती मिळतेच. येथे तटबंदीच्या अधिक सुरक्षेसाठी तटबंदीच्या बाहेरील बाजूस दुसरी तटबंदी बांधली. जेणेकरून आक्रमण होऊन बाहेरील तटबंदी ढासळलीच, तर आतील तटबंदीच्या सहाय्याने लढाई सुरू ठेवता येईल. अशाच प्रकारे तटबंदी सोबत चिलखती बुरुज बांधले. (Maharashtra Day)

गडकोटांच्या बांधकामाबाबतीत महाराज खूप लक्ष देत असत. हे अजून एका उदाहरणावरून कळते. राज्याभिषेक झाल्यावर महाराजांची दक्षिण मोहीम पार पडली. यात जिंजीचा गड जिंकण्यात आला. हा गड पाहताना त्यांना लक्षात आले की, यावरील काही बांधकामे चुकीची आहेत. काही ठिकाणी नव्याने बांधकाम करणे आवश्यक आहे. यावरून त्यांनी ते काम करून घेतले. यानंतर पाश्चात्य जेसूईट मिशनरी दक्षिणेत असताना त्यांना ही बातमी समजली व ते स्वतः हे काम पाहण्यास गेले व नंतर त्यांनी त्यांच्या प्रवास वर्णनात हे लिहून ठेवले. त्यात त्यांनी महाराज गडाबाबतीत किती दक्ष व अभ्यासू होते, हे लिहून ठेवले आहे. जमिनीवर जशी आपली सत्ता गडकोटांच्या सहाय्याने मजबूत आहे, तसेच समुद्रावर पण आपली सत्ता असायला हवी, या उद्देशाने महाराजांनी आरमार स्थापन केले. या आरमारासाठी अनेक जलदुर्गांची निर्मिती केली व अनेक ताब्यात घेतले. सुरतच्या लुटीतून मिळालेल्या पैशांपैकी एक कोटी होन इतके रुपये सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी खर्ची केले. आरमाराची राजधानी केली. या वेळीही बांधकाम करताना त्याच्या मजबुतीसाठी तटबंदीच्या पायाला शिसे ओतले. चुना उत्कृष्ट प्रकारचा वापरला. आजही समुद्राच्या पाण्याने दगड झिजले आहेत; पण चुना शाबूत आहे. (Maharashtra Day)

(हेही वाचा – BMC च्या दवाखान्यांमधील रुग्णांना मोबाईलवर मिळणार उपचाराच्या नोंदी)

गड व गडावरील वास्तू हे इतिहासाचे बोलते शिल्प आहेत. शिवरायांचे जन्मस्थळ असलेला शिवनेरी, राज्याभिषेक झालेला रायगड, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा सिंहगड, अफजलखान वधाचा साक्षीदार असणारा प्रतापगड, छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असणारा पुरंदर, मूठभर मावळे घेऊन हजारो शत्रूंशी कैक वर्ष लढा देणारा रामशेज, जंजिरेकर सिद्धीस शह देण्यासाठी भर समुद्रात बांधलेला पद्मदुर्ग असे अनेक गड इतिहासाची साक्ष आजही देत आहेत. गडावरील महत्त्वपूर्ण वास्तू आज उध्वस्त होताना दिसत आहेत. दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास संग्रामदुर्ग याचे देता येईल. चाकणचा किल्ला किंवा संग्रामदुर्ग. शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी जेव्हा या गडावर हल्ला झाला, तेव्हा फिरंगोजी नरसाळा मोजक्या शिबंदीसह गडावर होते. आज या गडाची अवस्था फार बिकट आहे. तटबंदी बुरुज वगळता आतील सर्व वास्तू पूर्णपणे उध्वस्त आहे. तटबंदी बुरुज यांचेही बरेचसे दगड ढासळत आहेत. गडाच्या बाहेरील बाजूस पूर्णपणे अतिक्रमण झाले असून गडाची तटबंदी फोडून स्थानिकांनी गडातून रस्ता केला आहे. गडाच्या मुख्य भागात देखील आक्रमण पाहायला मिळते. (Maharashtra Day)

गडकोट हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक आहेत. यातून वर्तमान व पुढील पिढी प्रेरणा घेऊ शकते. या गडकोटांचे संवर्धन व्हायलाच पाहिजे. गडकोटांच्या संवर्धनाची जबाबदारी राज्य पुरातत्व विभाग व केंद्रीय पुरातत्व विभागाकडून केले जाते. परंतू महाराष्ट्रात ४०० च्या आसपास गडकोट असले, तरी त्यात राज्य पुरातत्व विभागाकडे ५८, तर केंद्रीय पुरातत्व खात्याकडे ३५ गडच संरक्षित स्मारकात येतात. याचा अर्थ याच गडकोटांना संवर्धनासाठी निधी मिळू शकतो. त्यातून यांचे संवर्धन होत असले, तरी उर्वरित ३०३ गड हे असंरक्षित आहेत. यांचे संवर्धन कोण करणार, हा मोठा प्रश्न निर्माण होतो. “पुरातत्व अवशेष मे राष्ट्र की आत्मा का वास होता है” हे घोषवाक्य केंद्रीय पुरातत्व खात्याचे असले, तरी ते कामातून उतरताना दिसत नाही. आज ज्या काही संस्था आहेत, त्यांना याची जाणीव करून देऊन त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. प्रत्येक माणसाने हे आपलं कर्तव्य समजून काम करणे हे काळाची गरज आहे. अनेक लोक दुर्ग भ्रमंती करीत असतात, त्या वेळी गडावर गेल्यास एखादी वास्तू पडणार असल्याचे दिसताच त्याचे फोटो व माहिती घेऊन पुरातत्व विभागास तात्काळ कळवावे. ज्या स्वयंसेवी संस्था दुर्ग संवर्धन करतात त्यांनी पुरातत्व खात्याच्या परवानगीने काम करणे आवश्यक आहे. (Maharashtra Day)

(लेखक गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.