-
दुर्गेश जयवंत परुळकर
जगात सातत्याने विविध प्रकारचे विचारप्रवाह निर्माण होत असतात; पण त्यांना योग्य दिशा प्राप्त झालेली असतेच, असे नाही. काही विचारप्रवाह हे अत्यंत उथळ असून त्यांना व्याप्ती, उंची आणि खोली नसते. असे विचारप्रवाह माणसाची दिशाभूल करतात. अशा विचारप्रवाहांमुळे मानवी समाजाची मोठ्या प्रमाणात हानी होते. असा विचारप्रवाह म्हणजे पुरोगामी विचारप्रवाह आहे. काही विचारप्रवाहांची उंची, खोली आणि व्याप्ती अचंबित करणारी असते. अशा विचारप्रवाहांचा उगम शाश्वत सिद्धांतातून निर्माण झालेला असतो. अशा सिद्धांतांना स्थळकालाची मर्यादा नसते. अशा विचारप्रवाहाचा पुरस्कार महाराष्ट्रातील संतांनी केला आहे. हा विचारप्रवाहच महाराष्ट्राचा प्राण आहे; पण असा विचारप्रवाह नष्ट करण्याचे कार्य उथळ विचारप्रवाहाच्या पुरस्कर्त्यांकडून सातत्याने होत असते. अशा उथळ विचारांचे समर्थन करणाऱ्या लोकांना आजच्या आधुनिक परिभाषेत ‘पुरोगामी’ अशी संज्ञा देण्यात आली आहे. स्वतःला प्रगत समजण्याचा या लोकांचा दावा असतो. शाश्वत सिद्धांतांमधून उगम पावलेल्या विचारप्रवाहाला ‘प्रतिगामी’ म्हणून त्यांची हेटाळणी केली जाते. दुर्दैवाने महाराष्ट्रासारख्या मंगल आणि पवित्र भूमीत उथळ विचारांचा सुळसुळाट झाला आहे. (Maharashtra Day)
(हेही वाचा – Nashik Kumbh Mela 2027: साधूग्रामसाठी अतिरिक्त जागा भाडेतत्वावर घेण्यावर एकमत, ५०० एकर जागा आरक्षित केली जाणार)
महाराष्ट्राची भूमी म्हणजे संतांची मांदियाळी !
महाराष्ट्र भूमीच्या इतिहासाकडे पाठ फिरवून स्वतःला पुरोगामी म्हणवणारे तथाकथित विचारवंत आपल्या वेडगळ हट्टापायी महाराष्ट्राच्या थोर परंपरेची अपकीर्ती करत आहेत. महाराष्ट्राची भूमी ही संत, विचारवंत आणि वीरपुरुष यांची भूमी आहे. क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी तळपणारी भूमी आहे. इहलोक आणि परलोक यांना जोडणाऱ्या परमार्थाच्या वैभवाने विरक्ती अन् वैराग्य यांनी संपन्न असलेला महाराष्ट्र ही त्याची खरी ओळख असल्याची साक्ष भगवा ध्वज देतो. माता-पित्याच्या सेवेने परब्रह्माला प्रसन्न करून विठ्ठलभक्ती करणारा पुंडलिक म्हणजे भगवद्भक्तीचा जिवंत झरा आहे. ईश्वराच्याही आधी ज्या भक्ताचे नाव घेतले जाते, असा हा भक्तश्रेष्ठ पुंडलिक महाराष्ट्राचे वैभव आहे. आजही अखिल महाराष्ट्र उच्चस्वरात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयजयकार करतो. (Maharashtra Day)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, संत गोराकुंभार, संत सावतामाळी, संत चोखा मेळा, संत भानुदास, संत एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, समर्थ रामदासस्वामी, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शेगावचे गजानन महाराज, परभणीचे पाचलेगावकर महाराज, पुण्यातील धनकवडीचे शंकर महाराज, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अशी संतांची मांदियाळी या महाराष्ट्राच्या भूमीत अविरत चालू आहे. (Maharashtra Day)
संतभूमीतील पुरोगाम्यांचा कुटील डाव !
संत आणि पंत कवींनी या महाराष्ट्राच्या भूमीत भक्तीचा मळा फुलवला आहे. कर्तव्याची जाणीव महाराष्ट्राला करून दिली आहे. विविध जातींत जन्मलेल्या संतांनी मानवतेचा गौरीशंकर गाठला आणि माणसांमाणसात स्नेहभाव जागवला. हा स्नेहभाव नष्ट करण्यासाठी जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा कुटील डाव या उथळ विचारांचे पुरोगामी नतद्रष्ट करत आहेत. अमरावतीचे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या तेजस्वी ज्ञानाच्या बळावर डार्विनच्या सिद्धांताच्या चिंधड्या उडवल्या. (Maharashtra Day)
(हेही वाचा – Delhi Liquor Policy Scam: सिसोदिया आणि जैन यांच्या अडचणी वाढल्या; क्लासरूम घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल)
संतांची महती !
‘संत केवळ टाळ कुटायला लावतात’, असा आरोप त्यांच्यावर करून त्यांना अवमानित करण्यात आले होते. खरेतर सर्व संतांनी त्यांच्या अभंगांतून जीवनशिक्षण दिले आहे. प्रयत्नवादावर भर दिला आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या त्रिवेणी संगमाने भूतलावर स्वर्ग निर्माण करता येतो, अशी शिकवण या संतांनी दिली. ‘मानसिक दुर्बलता हा शाप आहे. माणसाची बुद्धी तेजस्वी असली पाहिजे. ईश्वराचा भक्त रडका नसतो. तो संकटांना घाबरून पळ काढत नाही. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांप्रमाणे तो कणखर आहे. तथापि त्याच्या काळजातून ममतेच्या नद्याही वाहत असतात’, असेही संतांनी सांगितले आहे. संतांची ही उज्ज्वल परंपरा आणि उच्चत्तम विचार यांच्याकडे पाठ फिरवून स्वतःला पुरोगामी म्हणवणारे संतांची निंदा करत सुटले आहेत. (Maharashtra Day)
भगवद्भक्तीला कलंकित करण्याचा प्रयत्न !
‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ या संतवचनाकडे पाठ फिरवून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून बौद्धिक तेजस्विता प्रकट करण्याच्या संतांच्या संकल्पाला काळीमा फासण्याचे काम पुरो(अधो)गाम्यांनी हाती घेतले आहे. संतांनी जनमानसात निर्माण केलेल्या भगवद्भक्तीला अंधश्रद्धा म्हणून कलंकित करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे टीकास्त्र केवळ हिंदू धर्म, हिंदू जाती, हिंदू परंपरा, हिंदू संस्कृती, हिंदू रीतीरिवाज यांवर सोडले जाते. महाराष्ट्राच्या भूमीत ज्ञान-भक्तीची गंगा अखंड वाहत आहे. ती प्रदूषित करण्याचे कार्य उथळ विचारसरणीच्या विकृत मनोविकारांनी पछाडलेले पुरोगामी करत आहेत. त्यांचे हे कुकर्म दिवसेंदिवस वाढत आहे. (Maharashtra Day)
(हेही वाचा – बांग्लादेशमधील इस्कॉनचे पुजारी Chinmay Das यांना अखेर जामीन मंजूर!)
संतांची शिकवण !
समर्थ रामदासस्वामींनी ‘मराठा तितका मेळावावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’, असे सांगून राष्ट्ररक्षण करताना मारता मारता मरेपर्यंत झुंजावे अशी वीरत्वाची शिकवण दिली आणि महाराष्ट्राच्या भूमीत क्षात्रतेज निर्माण केले. संत तुकाराम महाराजांनी नाठाळ माणसाच्या डोक्यात काठी हाणण्याची शक्ती स्वतःच्या मनगटात निर्माण केली. त्याचप्रमाणे मैत्रीलाही प्राधान्य दिले. माणसाने दयाळू वृत्ती जरूर जोपासावी; पण दुष्टांवर दया करता येत नाही. अशी ही शिकवण देऊन संतांनी व्यवहारवाद शिकवला. ‘दया तिचे नाव, भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे, दुष्टांचे निर्दालन करणे हीच दया आहे’, अशी शिकवण देण्यास संत विसरले नाहीत. संतांच्या या शिकवणीला अनुसरून महाराष्ट्रातल्या वीरांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा जतन केला. अखिल भारतभूमीला परकीय आक्रमकांच्या सावटातून मुक्त करण्यासाठी अटकेपार भगवा झेंडा फडकवणारे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. (Maharashtra Day)
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ।
अशा या महाराष्ट्राच्या भूमीचा गुणगौरव गाताना गोविंदाग्रज लिहितात…
पहिलावहिला अष्टांगानी प्रणाम हा त्याला ।
शहर पुण्याच्या, शिवनेरीच्या, पंढरीच्या देशा ॥
पुंडलिकाच्या, शिवरायांच्या, टिळकांच्या देशा ।
अनंत कोटी ग्रंथ रचुनिया जोडी तुझ्या नामा ॥
वाल्मिकीचें शतकोटी यश विष्णुदास नामा ।
जरी पटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा ॥
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥
गोविंदाग्रज काव्यातून हेच स्पष्टपणे सांगत आहे की, महाराष्ट्र ही पुरोगाम्यांची भूमी नसून संतांची भूमी आहे. पुरोगामी विचारांना गाडून महाराष्ट्राचे वैभव अबाधित ठेवणाऱ्या संत-पुरुषांना आणि राष्ट्रपुरुषांना विनम्र प्रणाम ! (Maharashtra Day)
(लेखक हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आहेत.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community