
-
प्रतिनिधी
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक असल्याने राज्यातील सर्व सागरी प्रकल्प, बंदरे, जेट्टी आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या सर्व कामगारांची कसून चौकशी करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बुधवारी दिले.
सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या व्हीसीद्वारे आढावा बैठकीत मंत्री राणे (Nitesh Rane) बोलत होते. महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्यावर सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सखोल तपासणी आणि कठोर कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग आणि एलिफंटा मार्गावरील फेरी सेवा आणि ससून डॉक परिसरात अवैध बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याची माहिती मिळाल्याने तो परिसर अत्यंत संवेदनशील असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
(हेही वाचा – जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे DCM Ajit Pawar यांच्याकडून स्वागत)
मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक, कोकण विभागाचे पोलीस अधिकारी आणि सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देताना सांगितले की, बंदरे व सागरी प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची सर्च ऑपरेशन व कोंबिंग ऑपरेशनद्वारे चौकशी करण्यात यावी. ओळखपत्र, आधार कार्ड यांची पडताळणी करावी आणि सर्व व्यक्तींना पोलीस पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे. तसेच ससून डॉक परिसरातील बोट चालक, फेरी चालक, कामगार, आणि इतर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. यासंदर्भात तातडीने नोटीस काढून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात याव्यात, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक दराडे, सागरी सुरक्षा पोलीस महानिरीक्षक शारदा राऊत आणि मुंबई पोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोका टाळण्यासाठी सरकार अधिक सजग असून, कोणताही संशयास्पद हालचाल किंवा अवैध व्यक्ती आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, असे मंत्री राणे (Nitesh Rane) यांनी बैठकीच्या समारोपाला सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community