-
प्रतिनिधी
एकट्या मुंबईत मागील तीन महिन्यांच्या कालावधीत ६७७ किलोपेक्षा जास्त अमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आले आहेच. एकूण ३४८ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४०४ जणांना अटक करण्यात आला. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत २२.९५ कोटी रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांमध्ये गांजाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई पोलिसांकडून जानेवारी ते मार्च २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत मुंबई शहरासह उपनगरातील वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये ६७७ किलोपेक्षा अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Ganeshotsav 2025 : पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन; मुंबई महापालिकेचा असाही पुढाकार)
विविध पोलीस ठाणे, अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा अंतर्गत ३४८ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून ४०४ जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी ६६४ किलो गांजा, ७.५८ किलो मफेड्रोन (एमडी) हेरॉईन, चरस असा एकूण ६७७ किलो अमली पदार्थांचा (Drugs) साठा जप्त करण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत पोलिसांनी हेरॉइन जप्तीशी संबंधित १८ गुन्हे दाखल केले आहेत. हेरॉइनशी संबंधित प्रकरणांमध्ये २४ जणांना अटक करण्यात आली आहे, तसेच १.८७ कोटी रुपये किमतीचे ०.६४ किलो हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Unauthorized Construction : रघुवंशी मिलमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा)
पोलिसांनी चरस जप्तीसंदर्भात ०७ गुन्हे दाखल केले आहेत. चरसशी संबंधित प्रकरणांमध्ये १० जणांना अटक केली आहे आणि २.८६ कोटी रुपये किमतीचे ४.६६ किलो चरस जप्त केले आहे. पोलिसांनी गांजा जप्तीसंदर्भात २३० गुन्हे दाखल केले आहेत. गांजाशी संबंधित प्रकरणांमध्ये २३८ जणांना अटक केली आहे आणि १.८१ कोटी रुपये किमतीचे ६६४ किलो गांजा जप्त केला आहे. उच्च दर्जाच्या ड्रग्जच्या (Drugs) बाबतीत, पोलिसांनी कोकेन जप्तीशी संबंधित ०३ गुन्हे दाखल केले आहेत. कोकेनशी संबंधित प्रकरणांमध्ये ०३ जणांना अटक केली आहे आणि १.९९ कोटी रुपये किमतीचे ०.६० किलोग्राम कोकेन जप्त केले आहे. पोलिसांनी मेफेड्रोन किंवा एमडी जप्तीशी संबंधित ६१ गुन्हे दाखल केले आहेत. एमडीशी संबंधित प्रकरणांमध्ये ८२ जणांना अटक केली आहे आणि १४.१० कोटी रुपये किमतीचे ७.५८ किलोग्राम एमडी जप्त केले आहे. पोलिसांनी प्रतिबंधित कफ सिरपशी संबंधित २४ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमध्ये ३५ जणांना अटक केली आहे आणि २९.१९ लाख रुपये किमतीचे कफ सिरप जप्त केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community