१०० वर्षांत पहिल्यांदाच पडला इतका पाऊस! अजित पवारांनी महापुरामागील सांगितले कारण  

कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झाले, हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला, असे अजित पवार म्हणाला.

89

राज्यात यंदाच्या वर्षात जो पाऊस पडला आहे, तो काही ठिकाणी मागील १०० वर्षांत पडला नाही इतका पाऊस पडला आहे, असे तज्ज्ञ स्वतः सांगत आहेत. त्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत जो पूर आला तो धरणांच्या पाण्यांमुळे नव्हे, तर धरणांच्या दरवाजाच्या समोरच्या भागांमध्ये अक्षरशः अतिवृष्टी झाली आणि ते पाणी जमा झाल्याने महापूर आला आहे, असे कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पवार हे सांगली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

२ दिवसांत पूरग्रस्तांना मदतीचा निर्णय! 

कोयना धरण बांधल्यापासून पहिल्यांदाच एका दिवसात साडे सोळा टीएमसी पाणी जमा झाले, हा रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. त्याचीच किंमत आपल्याला मोजावी लागली. मात्र, यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. शेतकरी, व्यापारी, मजूर यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आहेत. संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदत दिली जाईल. मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षणमंत्री सातत्याने आढावा घेत आहेत. केंद्राकडून राज्याला मदत करण्याचे काम सुरु आहे. केंद्र आणि राज्यात चांगला समन्वय सुरु आहे. राज्य सरकार कुठेही मागे हटणार नाही. दोन दिवसांत पूरस्थितीचे चित्र स्पष्ट होईल, त्यामुळे मुख्यमंत्री आणि सर्व मिळून आढावा घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

(हेही वाचा : भास्कर जाधवांच्या गैरवर्तनाची सेनेने गंभीर दखल घ्यावी! देवेंद्र फडणवीसांची सूचना )

दरड प्रवण क्षेत्रे वाढली!

कुठेही वृक्षतोड झाली नाही, त्यामुळे वृक्ष तोडीच्या कारणाने दरडी कोसळलेल्या, असे जे सांगितले जात आहे, हे चुकीचे आहे. सातारा भागात ज्या ठिकाणी दरडी कोसळल्या त्या ठिकाणी काळा पाषाण होता. तो खाली कोसळला आहे. आतापर्यंत जी ठिकाणी दरडप्रवण समजली जात होती, त्याव्यतिरिक्त भागात दरडी कोसळल्याने दरड प्रवण ठिकाणांमध्ये वाढ झाली आहे, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

एसडीआरएफची टीम कराड, रायगडला! 

राज्यात दरवर्षी अशाप्रकारे संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्यात एसडीआरएफची एक टीम कराडला ठेवता येईल का, याचा विचार सुरु आहे. रायगडला एक टीम ठेवली जाण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. NDRFच्या धर्तीवर राज्यात एसडीआरएफ तैनात राहणार, असेही पवार म्हणाले. बचाव पथकाने आतापर्यंत २ लाख २९ हजार ७४ लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले, एकूण १६४ मृत्यू झाले असून २५,५६४ जनावरांचे मृत्यू झाले आहेत. एकंदर ५६ लोक जखमी असून १०० लोक बेपत्ता आहेत. १०२८ गावे बाधित असून निवारा केंद्रे २५९, निवारा केंद्रातील लोक ७८३२ आहेत. एनडीआरएफच्या एकूण ३४ तुकड्या कार्यरत आहेत, त्यातील पालघर १, ठाणे २, रायगड १ , रत्नागिरी ६ , सिंधुदुर्ग २ , सांगली २ , सातारा ४, कोल्हापूर ८, मुंबई ३, पुणे ४, नागपूर १ येथे या तुकड्या आहेत. तटरक्षक दलाच्या २ तुकड्या रत्नागिरी, लष्कराच्या २ तुकड्या कोल्हापूर आणि सांगली येथे आहेत. एसडीआरएफच्या रायगड जिल्ह्यासाठी २, वर्ध्यासाठी १ अशा ३ तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत, अशीही माहिती अजित पवार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.