राष्ट्रीय तीर्थक्षेत्र अंदमान इथे ‘हिमश्री ट्रेक्स अॅण्ड टूर्स’ यांच्या वतीने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त (Ram Mandir Pranpratistha) अंदमान सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी पणत्या लावून, रांगोळी काढून आणि फुलांची सजावट करून राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला.
या सहलीवेळी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे वीर सावरकर यांचे प्रभु श्रीरामाविषयी विचार सांगताना म्हणाल्या की, ‘रामाचे अवतारकृत्य व श्रीरामचंद्रांची मूर्ती जोपर्यंत तुम्ही दृढतेने हृदयात धराल तोपर्यंत, हिंदूंनो, तुमची अवनती सहज नष्ट होण्याची आशा आहे. तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहन्ता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहजलब्ध रहाणारी आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातला राम नाहीसा झाला.’
पुढील काळातही, जेव्हा सावरकरांना मोकळेपणी भाषणं करण्याची परवानगी नव्हती तेव्हाही श्रीरामचंद्र, श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातले दाखले देत त्यांनी देशवासियांना ब्रिटिशांविरोधात उभे ठाकण्यास प्रवृत्त केलं होतं, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सेल्युलर कारागृहात वीर सावरकर यांना अभिवादन
यावेळी सेल्युलर कारागृहातील वीर सावरकरांच्या कोठडीतही पणत्या लावून, ‘जयोsस्तुते’ हे स्वतंत्रतेचे स्तोत्र गाऊन सावरकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सावरकर म्हणाले होते, माझी मार्सेची उडी विसरलात तरी चालेल; पण माझं हिंदू संघटन कार्य विसरू नका. श्रीराम या देवासाठी आज समस्त हिंदू समाज संघटित झाला आहे. ‘देश’ या आपल्या देवासाठीसुद्धा असेच संघटित होऊ या आणि सावरकरांचे स्वप्न साकार करूया, असे सांगून आपल्या भाषणाद्वारे त्यांनी वीर सावरकर यांच्या विचारांना उजाळा दिला.