मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक व्यवस्थापन यंत्रणेसाठी सीसीटीव्ही उभारण्यात येणार आहेत. यासाठी कमानी बसविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे गुरुवारी (11 जानेवारी) ३ तास महामार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
महामार्ग वाहतूक पोलिसांकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर महामार्ग वाहतूक व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही उभारण्यासाठी कमानी बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे आज, गुरुवारी दुपारी तीन तास महामार्गावरील पोलिस केंद्र पळस्पे हद्दीत मुंबई मार्गिकेवरील वाहतूक पूर्णत: बंद करण्यात येईल. त्यामुळे या कालावधीत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी तसेच या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
(हेही वाचा – Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तीन तास राहणार बंद, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कसे असेल नियोजन; वाचा सविस्तर )
सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद
कमानी बसवण्याचे काम मे. प्रोक्टेक सोल्युशन, आयटीएमएस, एलएलपी कंपनीकडून करण्यात येत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे हद्दीत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर गुरुवारी दुपारी १.३० ते ३.३० या कलावधीत हे काम केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत मुंबई मार्गिकेवरील सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय महामार्ग वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक राज्याचे वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक रवींद्र कुमार सिंगल यांनी जारी केले आहे.
वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग निश्चित…
सी. सी. टीव्ही यंत्रणा बसवण्याच्या कामामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. त्यानुसार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी हलकी वाहने व बसना खोपोली एग्झिट येथून वळवून जुन्या (राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८) पुणे-मुंबई महामार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाकामार्गे मुंबई मार्गिकेवरून जाता येईल. हलक्या व जड-अवजड वाहनांना खालापूर टोल नाका येथून शेवटच्या मार्गिकेने खालापूर एग्झिट येथून जुन्या पुणे-मुंबई मार्गावरून खोपोली शहरातून पुढे शेडुंग टोल नाकामार्गे मुंबईच्या दिशेने जाण्यास मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुन्या महामार्गावरून पुण्यावरून मुंबईकडे जाणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोलनाक्याऐवजी सरळ पनवेलच्या दिशेने जातील. ही वाहतूक अधिसूचना काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community