शिवडी परिसरातील ‘टनेल शाफ्ट’ (गाडी अड्डा टनेल) येथे काही दिवसांपूर्वी पाण्याची मोठी गळती उद्भवली होती. कोविडच्या पार्श्वभूमीवर ही गळती दुरुस्त करणे हे एक आव्हानच होते. मात्र, जल अभियंता व जल कामे विभागाच्या चमूने युद्धस्तरावर कार्यवाही करुन, हे दुरुस्ती काम केवळ अडीच तासांच्या अल्पावधीत व योग्य प्रकारे नुकतेच पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही भागाचा पाणीपुरवठा बंद न करता, हे काम कौशल्यपूर्ण पद्धतीने करण्यात आले आहे.
उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) अजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली तसेच सहाय्यक अभियंता (जलकामे) (तातडीचा दुरुस्ती विभाग) जीवन पाटील यांच्या पुढाकाराने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली.
महापालिकेच्या टिमला यश
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध परिसरांना पाणीपुरवठा करणाऱ्या भंडारवाडा जलाशय, गोलंजी हिल जलाशय व फॉसबेरी जलाशय, या तीन जलाशयांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवरील ‘टनेल शाफ्ट’ मध्ये ही गळती उद्भवली आहे. कोट्यावधी लिटर पाणी वाया जाण्याची शक्यता होती. ज्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, बुधवारी २८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ७ ते ९:३० या केवळ अडीच तासांच्या कालावधी दरम्यान योग्यप्रकारे हे काम पूर्ण करण्यात आल्यामुळे, भविष्यात वाया जाणारे कोट्यावधी लिटर पाणी वाचवण्यात महापालिकेच्या संबंधित टिमला यश आले आहे.