राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली असून, मुंबईत एका दिवसात ५ हजारांच्या वर कोरोना रुग्णांचा आकडा पोहोचला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंतेचे कारण बनत असली तरी देखील सत्ताधारी आणि विरोधक मात्र सचिन वाझे, परमबीर सिंग, रश्मी शुक्ला याच प्रकरणांत व्यस्त आहेत. विरोधक ठाकरे सरकारला या प्रकरणावरुन कसे कोंडीत पकडायचे याची व्यूहरचना आखायचा विचार करत आहेत, तर सत्ताधारी या सर्व आरोपांतून आपली कशी मुक्तता करुन घ्यायची याचा विचार करत आहेत. त्यामुळेच एकीकडे राज्यात कोरोना गंभीर आणि राजकारणी राजकारण करण्यात खंबीर आहेत, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कॅबिनेटमध्येही लेटर बॉम्बवरच चर्चा
बुधवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. खरेतर या बैठकीमध्ये राज्यातील वाढत्या कोरोना परिस्थितीवर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र या बैठकीत सर्वाधिक चर्चा झाली, ती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाची तसेच रश्मी शुक्ला यांनी केलेल्या फोन टॅपिंगची. तब्बल तीन तासांहून अधिक वेळ चाललेल्या या कॅबिनेट बैठकीत कोरोनावर किती वेळ चर्चा झाली, असा प्रश्न आता सगळ्यांना पडू लागला आहे. या बैठकीमध्ये मंत्र्यांचे फोन टॅप होतात मग आपण काम कसे करायचे, असे मंत्र्यांनी बोलून दाखवले. पण राज्यात कोरोना वाढत चालला आहे त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात, असे एका मंत्र्यालाही वाटले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फक्त नावाला कॅबिनेट बैठक होती यामध्ये चर्चा मात्र सचिन वाझे, परमबीर सिंग, रश्मी शुक्ला आणि मंत्र्यांचे फोन टॅपिंग यावरच झाली. त्यामुळे एकूणच कोरोनाचे संकट वाढत असताना राज्य सरकार मात्र स्वत:वर होणाऱ्या आरोपांवर चर्चा करण्यात व्यस्त आहे.
(हेही वाचाः देशमुखांनीही लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र! म्हणाले आता होऊनच जाऊद्या…)
विरोधकांनाही सचिन वाझे प्रकरणात रस
सचिन वाझे प्रकरणावरुन अधिवेशनापासूनच सरकारवर तुटून पडलेल्या विरोधकांनाही राज्यात वाढणाऱ्या कोरोना आकडेवारीचा विसर पडला आहे. राज्यातील कोरोना आकडेवारीवर नेहमीच सरकारवर टीका करणारे विरोधक मात्र यावेळी आकडे वाढत असताना, परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बवरुन राज्य सरकारला कोंडीत पकडत आहेत. एवढेच नाही तर विरोधकांकडून राज्यात आंदोलने देखील सुरू आहेत. त्यामुळे कोरोनापेक्षा विरोधकांनाही सचिन वाझे आणि राज्यातील राजकीय उलथापालथीमध्ये जास्त रस असल्याचे सर्वसामान्य खाजगीत बोलत आहेत.