मुंबईसह ठाणे, कल्याण पालघर आणि नवी मुंबई जिल्हयांमध्ये कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत झाल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांसह मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन नियंत्रण कक्षाला भेट देवून पावसाचा आढावा घेतला. यावेळी मुंबईकरांसह ठाणे, कल्याण आण नवी मुंबईसह पालघर जिल्ह्यातील जनतेला आवश्यक असेल तरच घरा बाहेर पडा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन केले. दरम्यान या मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी केली.
मुंबईसह ठाणे, पालघर, कल्याण आणि नवी मुंबई आदी भागांमध्ये मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसातही मुंबईत कुठेही पाणी तुंबण्याचे प्रकार घडले नसले तर कल्याण अंबरनाथ येथे नदीच्या पाण्याची पातळी वाढल्या तेथील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे डोंबिवली आणि त्यानंतर कल्याण पर्यंतच रेल्वे लोकल सेवा सुरु होत्या. त्यामुळे डोबिंवली आणि कल्याणच्या पुढे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची प्रचंड हाल झाले. त्यातच पाऊस अधिक लागल्यास या लोकल सेवाही बंद पडतील या भीतीने अनेक कार्यालये लवकर सोडण्यात आली, परिणामी आधीच रेल्वे लोकल उशिराने धावत होत्या, त्यात प्रवाशांची गर्दी वाढल्याने प्रवाशांनाही मिळेल त्या लोकलमधून गर्दीतून प्रवास करावा लागला.
या पावसाच्या पार्श्वभूमीवर विधीमंडळाचे अधिवेशन संपवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन मंत्री शंभुराजे देसाई यांच्यासह महापालिका आपत्कालिन नियंत्रण कक्षाला भेट देऊन पावसाचा आढावा घेऊन कोणत्याही प्रकारे जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जावी असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त पी वेलारासू, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, आपत्कालिन नियंत्रण कक्षाच्या प्रमुख संगीता लोखंडे आदी उपस्थित होते.
(हेही वाचा – …तर सत्तेवर असताना स्ट्रिट फर्निचरच्या आरोपांची चौकशी का केली नाही?)
राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. नागरिकांनी आवश्यक त्या कामाशिवाय बाहेर पडू नये व सुरक्षित स्थळी राहावे असे आवाहन त्यांनी केले. सकाळपासूनच आपण मुख्य सचिव तसेच काही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून नागरिकांची गैरसोय होऊ नये तसेच कुठलीही आपत्ती आल्यास तातडीने मदत व बचाव कार्य सुरू करावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या असल्यसाचे त्यांनी मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. एनडीआरएफ तसेच एसडीआरएफ च्या तुकड्या तैनात आहेत. तसेच मुंबई व परिसरातील मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लवकर सोडले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले होते. मुख्यमंत्री आणि मुंबई महापालिकेच्या वतीने रेल्वे प्रवाशांसाठी चहा आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community