मुंबई महानगरपालिकेच्या १९६ माध्यमिक शाळांमध्ये मिळून २९४ कौशल्य विकास केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचा पायलट प्रोजेक्ट ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट शाळेत उभारण्यात आला असून त्याचे लोकार्पण राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी १५ जुलै २०२३ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याचे कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री व स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा, स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, आमदार राजहंस सिंह आदी मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार आहेत.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार व इतर मान्यवर या समारंभास उपस्थित राहणार आहेत. लवकरच महानगरपालिकेच्या १९६ माध्यमिक शाळांमध्ये मिळून अशा प्रकारची २९४ कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू होत आहे. विशेष म्हणजे, या सर्व २९४ कौशल्य विकास केंद्रांचे मुख्य नियंत्रण कक्ष व प्रशिक्षण केंद्रही जगन्नाथ शंकरशेट नाना चौक शाळेतच उभारण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी यांनी दिली आहे.
कौशल्य विकास केंद्र अंतर्गत प्रशिक्षण देण्यात येणारे अभ्यासक्रम
शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्य विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने पाऊले उचलली आहेत. या धोरणाचा एक भाग म्हणून नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत सरकारी माध्यमिक शाळांमध्ये कौशल्य विकास केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास सोसायटी आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रँट रोड येथील जगन्नाथ शंकरशेट शाळेत पथदर्शी प्रकल्प उभारण्यात आला आहे.
(हेही वाचा – ठाकरे गटाकडे मशाल राहणार की जाणार? सर्वोच्च न्यायालयात १७ जुलैला सुनावणी)
या अंतर्गत नववी आणि दहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना १० अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. यामध्ये, आर्टीफिशियल इंटेलिजियन्स, फॅशन डिझायनिंग, फिल्ड टेक्निशियन्स (होम अप्लायन्सेस), फिल्ड टेक्निशियन्स (ए. सी.), रोबोटिक्स, प्लंबिंग, फूड ॲण्ड बेव्हरेजेस सर्व्हिस असिस्टंट, स्टोअर ऑपरेशन असिस्टंट, मल्टि स्किल टेक्निशियन असिस्टंट आणि मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट/जनरल ड्युटी असिस्टंट आदी दहा अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानासाठी संगणक प्रयोगशाळा आणि विज्ञान-तांत्रिक विषयासंदर्भात स्वतंत्र प्रयोगशाळा विकसित केल्या जाणार आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी प्रशिक्षित शिक्षक, अतिथी व्याख्याता नेमण्यात येणार आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना औद्योगिक भेटीही घडविल्या जाणार आहेत. एवढेच नव्हे तर, या विद्यार्थ्यांना संभाषण कौशल्य, स्वयंव्यवस्थापन कौशल्य, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान कौशल्य, व्यावसायिकता कौशल्य आणि हरित कौशल्य शिक्षण यांचे धडे देखील दिले जाणार आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community