मुंबईसह राज्यातील अनेक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच आता दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरातील उद्यान गणेश मंदिरामध्ये तर चक्क गणेश मूर्तीला अर्पण करण्यात येणारे पुष्पहार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या मंदिरामध्ये केवळ सुट्टी फुलेच गणेश मूर्तीला अर्पण केली जाणार असल्याने यापुढे भाविकांनी पुष्पहार आणू नये अशाच प्रकारच्या सूचनाच श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीने दिल्या आहेत. त्यामुळे या मंदिराच्या आवारात फुल आणि हार विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायावरच आता गदा आली आहे.
दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये सन १९७०मध्ये गणेश मंदिराची स्थापना करण्यात आली. या गणेश मंदिराला उद्यान गणेश मंदिर म्हणून ओळखले जात आहे. त्यानंतर २०१२मध्ये या मंदिराच्या जीर्णौध्दाराचे काम हाती घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान परिसरात फिरण्यास येणाऱ्या स्थानिकांसह बाहेरील पर्यटकही या उद्यान मंदिरात गर्दी करत असतात. मंबईतील अनेक देवस्थानांपैंकी एक असे दादर शिवाजीपार्क येथील उद्यान गणेश मंदिर एक असून या मंदिरात उजवी सोंड असलेली (सिध्दिविनायक), शंख,लाडू, हस्तिदंत व गदा धारण केलेली चतुर्हस्त अशा चांदीची बाल गणेशोची मूर्ती आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूूला रिध्दी-सिध्दी आणि लक्ष-लाभ उभे आहेत.
(हेही वाचा – नाल्यांच्या बांधकामांपासून ते नालेसफाईपर्यंतच्या कामांवर १८ महिला अभियंत्यांचे लक्ष)
मात्र, या मंदिराच्या सेवा समितीने, आता श्री उद्यान गणेशाच्या मूर्तीवरील चांदीच्या मुलाम्यावर फुलांमधील रसायनांचा विपरीत परिणाम होत असल्याने भक्तांकडून अर्पण केले जाणारे हार, गजरे यांचा स्वीकार न करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या बाहेरच सूचना फलक लावून भाविकांना ही सूचना केली आहे. त्यामध्ये भक्तांकडून फक्त श्रीफळ, दुर्वा, सुटी फुले स्वीकारण्यात येतील. परंतु हार, गजरे स्वीकारण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे.
मंदिराच्या सेवा समितीने घेतलेल्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरली असून प्रत्येक भक्त आपल्या श्रध्देनुसार सुवासिक फुलांचे हार श्रींच्या चरणी अर्पण करता असतात. परंतु अशाप्रकारचे फुलांचे हार अर्पण करता येणार नसल्याने भक्त मंडळींमध्ये नाराजी पसरलेली पहायला मिळत आहे. मात्र, या निर्णयामुळे याठिकाणी अनेक वर्षांपासून पुष्पहार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांच्या व्यवसायावरही परिणाम होणार आहे. याठिकाणी केवळ दुर्वा, लाल फुले किंवा सुट्टी फुले विकण्यास परवानगी असली तरी पुष्पहाराच्या विक्रीतून खऱ्या अर्थाने कमाई होत असल्याने या व्यवसायावर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community