उद्धव ठाकरे गटाला सोमवारी सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. ठाकरे गटाला पुढील आदेशापर्यंत ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह म्हणून वापरण्याची मुभा मिळाली आहे. मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
( हेही वाचा : कोकणात जाताय? परशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत दररोज ६ तास राहणार बंद!)
शिवसेनेला तात्पुरता दिलासा
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आले होते. त्याची मुदत 27 मार्च रोजी संपणार होती. त्यापूर्वीच समता पार्टीने मशाल या चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता मोठ्या राजकीय संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवत शिंदे आणि ठाकरे गटाला वेगवेगळे नाव आणि चिन्ह दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला शिवसेना अशी मान्यता मिळाल्यानंतर ठाकरे गटाचे नाव आणि चिन्ह अद्याप बदलण्यात आलेले नव्हते. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून नवे नाव आणि चिन्ह दिले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community