राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, अटक होणार?

91

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबाद येथील सिटी चौक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी 1 मे च्या सभेदरम्यान पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचं उल्लंघन केल्याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्यानुसार राज ठाकरे यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या कलमांतर्गत गुन्हा दाखल

सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात राज ठाकरे यांचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आयपीसीच्या कलम 116, 117,153(अ) आणि मुंबई पोलिस कायदा अधिनियम 135 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील काही कलमे ही अजामीनपात्र आहेत. पोलिसांनी घालून दिलेल्या 16 अटींचं राज ठाकरे यांनी उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 153(अ) हे सर्वात महत्वाचं कलम असून, 116 आणि 117 ही उपकलमे असल्याचे कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल)

कलम 116 व 117- दहापेक्षा जास्त लोकांना एखादी बेकायदेशीर कृती करण्यास चिथावणे.

कलम 153(अ)- हे सर्वात महत्वाचं कलम आहे. जाती, धर्म यावर आधारित द्वेष पसरवणे, तेढ निर्माण करणे आणि सामाजिक अशांतता पसरवणे यासाठी या कलमाचा वापर करण्यात येतो.

दाखल झालेला हा गुन्हा अजामीनपात्र आहे. राज ठाकरे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करू शकतात. जर पोलिसांनी हा अर्ज फेटाळला तर त्यांना अटक होऊ शकते. अटकेनंतर काही अटींच्या आधारे त्यांना जामीन मिळू शकतो. दाखल झालेल्या गुन्ह्यांना राज ठाकरे उच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतात, असं कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

(हेही वाचाः … तर मनसैनिक रस्त्यावर उतरतील, सरकारने तयार रहावे; मनसेचा इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.