‘अमृत काळात देशाची नवीन परिभाषा, व्यवस्थेची नवीन मांडणी निर्माण करत आहे’

118

स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश नवीन परिभाषा निर्माण करत आहे. सोबतच नवीन व्यवस्था देखील निर्माण करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. खेळांकडे राजकीय दृष्टिकोनाऐवजी अंतिमतः खेळाडूंच्या दृष्टिकोनातून बघितले जात आहे. युवकांना काहीही अशक्य नाही आणि त्यांच्या क्षमता, स्वत्व, स्वावलंबन, सुविधा आणि संसाधनांची खरी ओळख त्यांना झाल्यावर प्रत्येक बाब ही सोपी होते, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जयपूर महाखेलला दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी त्यांनी एका कबड्डी सामन्याचा आनंदही लुटला. जयपूर ग्रामीण लोकसभा मतदार संघाचे खासदार राज्यवर्धन सिंह राठोड हे २०१७ पासून जयपूर महाखेल या क्रीडा उपक्रमाचं आयोजन करत आहेत.

शिकण्याची प्रवृत्ती बाळगली तर विजय निश्चित!

या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी या महाक्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारे खेळाडू, प्रशिक्षक आणि कुटुंबियांचे अभिनंदन केले. खेळाडूंनी क्रीडा क्षेत्र, केवळ खेळात सहभागी होण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठी आणि शिकण्यासाठी आपलेस केले आहे, असे त्यांनी नमूद केले. शिकण्याची प्रवृत्ती बाळगली तर विजय निश्चित होतो, असे सांगताना पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक खेळाडूला क्रीडाक्षेत्र काही ना काही तरी देतच असते.

क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव नव्या यशोशिखरावर नेणारे अनेक नामवंत चेहरे!

क्रीडा क्षेत्रात भारताचे नाव नव्या यशोशिखरावर नेणारे अनेक नामवंत चेहरे या स्पर्धेसाठी उपस्थित असल्याचे लक्षात घेत, पंतप्रधानांनी राम सिंग, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेते दिव्यांग क्रीडापटू देवेंद्र झाझरिया, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेती साक्षी कुमारी, अर्जुन पुरस्कारप्राप्त आणि इतर ज्येष्ठ खेळाडूंचा आपल्या संबोधनात गौरवपूर्ण उल्लेख केला. जयपूर महाखेल मध्ये स्पर्धेत उतरलेल्या युवा खेळाडूंना उत्तेजन देण्यासाठी भारतातील हे नामवंत क्रीडा चेहरे पुढे आल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.

क्रीडा विषयक महत्त्वपूर्ण बदलांचं प्रतिबिंब!

देशभरात एका मागोमाग एक आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धा आणि खेळ महाकुंभांची मालिका, हे देशात होत असलेल्या क्रीडा विषयक महत्त्वपूर्ण बदलांचं प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. राजस्थानची भूमी युवावर्गाचा ध्यास आणि जोम, जोश यासाठी ओळखली जाते असे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की, या भूमीतील मुलांनी आपल्या पराक्रमाने आपल्या जोरदार कामगिरीने रणांगणाला क्रीडांगणात परिवर्तित केल्याचा, इतिहास हा पुरावा आहे. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा राजस्थानचे तरुण नेहमीच इतरांपेक्षा पुढे असतात, असे सांगत पंतप्रधानांनी या प्रदेशातील तरुणांची मानसिक आणि शारीरिक क्षमतांची जडणघडण करण्याचे श्रेय राजस्थानच्या क्रीडा परंपरांना दिले. मकर संक्रांतीच्या वेळी आयोजित केल्या जाणाऱ्या आणि शेकडो वर्षांपासून राजस्थानच्या परंपरेचा भाग असलेल्या दडा, सितोलिया आणि रुमाल झपट्टा या पारंपरिक खेळांची त्यांनी उदाहरणे दिली.

(हेही वाचा – शेतकऱ्यांनी हातात लेखणी घेऊन कायदा बनवण्याची वेळ – तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव)

भारतीय युवकांमध्ये खेळाबद्दलची ओढ आणि प्रतिभेची कमतरता नाही!

पंतप्रधानांनी सांगितले की, भारतातल्या युवकांमध्ये खेळाबद्दलची ओढ आणि प्रतिभेची कमतरता नाही तर सरकारकडून मिळणाऱ्या संसाधने आणि सहकार्याची अनुपलब्धता यामुळे अडथळे निर्माण होत असतात. खेळाडूंना भेडसावणाऱ्या या समस्यांवर आता मार्ग काढला जात असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. जयपूर महा खेळाचे उदाहरण देत ते म्हणाले की, अशा प्रकारच्या स्पर्धा गेल्या पाच-सहा वर्षांपासून आयोजित केल्या जात आहेत. तसेच भाजपाच्या संसद सदस्यांकडून देशाच्या प्रत्येक भागात खेळ महा कुंभ आयोजित केले जात असून त्या माध्यमातून हजारो युवकांची प्रतिभा पुढे येत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितले.

या वर्षी कबड्डी स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणारी महाखेल स्पर्धा, राष्ट्रीय युवा दिनी १२ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली. यात जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघातील सर्व ८ विधानसभा क्षेत्रांतील ४५० पेक्षा जास्त ग्रामपंचायती, नगरपालिका आणि प्रभागांतील ६,४०० हून अधिक युवक आणि खेळाडूंचा सहभाग होता. महाखेलचे आयोजन जयपूरच्या तरुणांना त्यांची क्रीडा प्रतिभा दाखवण्याची संधी देते आणि त्यांना क्रीडा क्षेत्र करिअरचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करते, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.