वाघांच्या वाढत्या हल्ल्यात ‘त्या’ वाघीणींकडे दुर्लक्ष; काय आहे नेमका प्रकार?

152

चंद्रपुरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यात यंदाच्या वर्षी तब्बल ५० माणसांचा बळी गेला आहे. १२ डिसेंबरला २४ तासांत वाघांच्या हल्ल्यात तीन माणसांचा बळी गेल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लेखोर वाघांना तातडीने जेरबंद न केल्यास निलंबनाचा इशारा दिला. कारवाईच्या धास्तीने वनविभागाची वाघांना जेरबंद करणारी टीम ब्रह्मपुरीतील दोन वाघीणींच्या स्थलांतराचा कार्यक्रम गुंडाळून आता हल्लेखोर वाघांना शोधतेय. या गडबडीत तीन वेळा या दोन वाघींणींना पकडून नवेगाव-नागझिरा येथे सोडण्याचा वनाधिका-यांचा प्रयत्न फसल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

दोन वाघीणींना नवेगाव नागझिरा येथे हलवण्याचा निर्णय

चंद्रपुरात वाघांची संख्या वाढत असल्याने ब्रह्मपुरीतील दोन वाघीणींचे पहिल्या टप्प्यात इतरत्र स्थलांतर करण्याचा निर्णय वनविभागाने यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला घेतला होता. गडचिरोलीतील सिटी १ वाघ तसेच हत्तींच्या आगमनाने वनविभागाचे मोठे मनुष्यबळ या दोन्ही घटनांमागे व्यस्त राहिले. पावसाळ्यानंतर चंद्रपुरातील ब्रह्मपुरीतील अडीच वर्षांच्या दोन वाघीणींना नवेगाव नागझिरा येथे हलवण्याचा निर्णय झाला. आवश्यक परवानग्या मिळेपर्यंत यातील एक वाघीण ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला निघून गेली. माणसांवर हल्ला न केलेल्या दोन वाघीणींना पहिल्या टप्प्यात नवेगाव-नागझिरा येथे स्थलांतरित करण्याची वनाधिका-यांची योजना आहे. नव्या वाघीणीचा शोध घेत असताना हत्तींचा कळपही गडचिरोली, भंडारा, गोंदिया या भागांत स्थलांतरित होत होता.

(हेही वाचा तुनिषाला झीशानने ‘वापरले’; आईचा गंभीर आरोप )

वनाधिकारी घाबरले

२२ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात ब्रह्मपुरीत निवडलेल्या दोन्ही वाघीणींना जेरबंद करण्यासाठी अगोदर पिंज-यात पाळीव प्राणी ठेवले गेले. परंतु वाघीणींनी पिंज-यात जाऊन भक्ष्याला पकडण्यास पसंती दिली नाही. सलग तीन प्रयत्न फसलेले असतानाच चंद्रपूरात इतरत्र ठिकाणी वाघांचे हल्ले वाढू लागले. परिणामी वाघांना पकडणारी वनाधिका-यांची टीम इतरत्र दाखल झाली. १२ तारखेपासून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तंबीनंतर हल्लेखोर वाघांची ओळख पटवण्यात वनाधिका-यांची कसरत होत आहे. कॅमेरा ट्रेपच्या मदतीनेही नेमका वाघ ओळखण्यास वनाधिका-यांना अपयश येत आहे. नेमक्या हिवाळी अधिवेशनात वाघाने हल्ला केल्यास अधिवेशनात गदारोळ माजण्याची शक्यता असल्याने वनाधिकारी भलतेच घाबरलेले आहेत. या दिवसांत वाघांच्या हल्ल्यात माणसाचा बळी गेल्यास निलंबन अटळ असल्याने ब्रह्मपुरीतील वाघीणींच्या स्थलांतरित कार्यक्रमाला मोठा ब्रेक लागण्याची भीती व्यक्त होत आहे.

 नाहीतर पुन्हा नव्याने सुरुवात

अडीच वर्षांच्या वाघीणींना या वयातच दुस-या प्रदेशात स्थलांतरित करता येते. तीन वर्ष उलटल्यानंतर त्यांना प्रदेश ओळखता येतो. परिणामी, त्यानंतर वाघीणीच्या स्थलांतरानंतर वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात म्हणून दोन्ही वाघीणींना रेडिओ कॉलरिंग करुन त्वरित नवेगाव नागझिरा येथे सोडले गेले पाहिजे, असे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.