डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांना सहकाऱ्यांच्या संपर्कात राहण्यासाठी महापालिकेने पुरवली ‘ही’ महत्त्वाची सेवा

102

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिर्मित्त दादर परिसरातील चैत्यभूमीवर येणाऱ्या आंबेडकर अनुयायांसाठी महापालिकेच्यावतीने विविध सेवा सुविधा तसेच विविध संस्थांच्यावतीने मदतीचा हातभार लावण्यात आला असला तरी आजच्या आधुनिक काळात भ्रमणध्वनी(मोबाईल फोन) हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांची मोबाईल चार्जिंग अभावी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये तसेच त्यांना आपला मोबाईल चार्ज करता यावा यासाठी महापालिकेच्यावतीने शिवाजीपार्क येथील निवारा शेडसह इतर भागांमध्ये ३०० हून मोबाईल फोन चार्जिंची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे चैत्यभूमीवर आलेल्या प्रत्येक अनुयायांना आपल्या सहकाऱ्यांच्या संपर्कात राहणे सोपे झाले.

( हेही वाचा : शीव रुग्णालयासमोरील चौकात बाबासाहेब आंबेडकर यांचे शिल्प)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या दादर परिसरातील चैत्यभूमी स्मारक येथे महाराष्‍ट्र राज्‍याचे माननीय राज्‍यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा आणि इतर मान्यवरांनी मंगळवारी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

मुंबई महानगरपालिकेच्‍या जनसंपर्क विभागाच्‍या वतीने चैत्‍यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शन चैत्यभूमी लगतच्या माता रमाई आंबेडकर स्मृती व्ह्यूविंग डेक नजिक उभारण्‍यात आले आहे. या प्रदर्शनास राज्‍यपाल महोदयांसह मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री व मान्यवरांनी भेट देऊन छायाचित्रांची पाहणी करण्यासह संबंधित माहिती घेतली. याप्रसंगी उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, ‘जी/उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे यांच्‍यासह विविध मान्‍यवर उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अविश्रांत प्रवास करुन येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. यंदा उभारण्यात आलेल्या दोन्ही भव्य मंडपांचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे कमीत-कमी खांबांचा वापर करुन हे मंडप उभारण्यात आले आहेत. या मंडपांमध्ये विद्युत व्यवस्थेसोबतच चैत्यभूमी येथील अभिवादनाचे थेट प्रक्षेपण सहजपणे पाहता यावे, यासाठी भव्य स्क्रीन बसविण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर नागरिकांना त्यांच्या भ्रमणध्वनीचे चार्जिंग सहजपणे करता यावे, यासाठी विपुल प्रमाणात चार्जिंग पॉईट्स देण्यात आले आहेत. तब्बल ३०० हून अधिक चार्जिंग पॉईंटस देण्यात आल्याने अनुयायांना आपले मोबाईल चार्ज करणे शक्य होत होते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि चैत्यभूमी परिसरांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा ठिकठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परिसरातील विविध ठिकाणी प्रसाधनगृहे, शौचालये, स्नानगृहे इत्यादी व्यवस्था देखील उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नागरी सेवा-सुविधा अनुयायांना यथायोग्य प्रकारे मिळाव्यात, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागासह इतर खाते व विभागातील सुमारे ५ हजार इतक्या संख्येने कामगार – कर्मचारी – अधिकारी अव्याहतपणे कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असणा-या बेस्ट उपक्रमाद्वारे सर्व संबंधित ठिकाणी अतिरिक्त विद्युत दिवे, पथदिवे इत्यादी बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी उच्च क्षमतेचे ४ जनित्र देखील सुसज्ज ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर दादर चौपाटी, महापौर निवास व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ज्ञानेश्वर उद्यान या ठिकाणी प्रखर प्रकाश असणारे उच्च क्षमतेचे ‘शोध दिवे’ (सर्च लाईट) देखील बसविण्यात आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.