जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त एक भव्य “ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा” २८ नोव्हेंबर रोजी सहायक आयुक्त (नियोजन) विभागाच्या वतीने रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. या आनंद मेळाव्यात जवळपास ६०० ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. यात सहभागी झालेल्या ९० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांच्या लग्नाला साठ वर्षे झाली आहेत, अशा दांपत्यांचा सत्कार प्रातिनिधिक स्वरूपात स्थानिक आमदार सदा सरवणकर तसेच महापालिका उपायुक्त बिरादार तसेच सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आला. कोविडनंतर मागील दोन वर्षात प्रथमच सर्व आजी आजोबांनी एकत्र येत संगीताचा आस्वाद घेत एक आगळा वेगळा आनंदाचा क्षण अनुभवला. विशेष म्हणजे ज्येष्ठांच्या या आनंद मेळाव्यात ज्येष्ठांनीच जुनी गाणी सादर केली आणि ही गाणी सादर करत सर्वांनाच त्यांनी काही क्षण आपल्या भूतकाळात नेऊन ठेवले होते.
२०१३ मध्ये ज्येष्ठ नागरीक धोरणास मंजुरी देण्यात आली
ज्येष्ठ नागरीक यांच्याकरिता चांगल्या योजना राबविण्यात याव्यात व त्यांचे उर्वरित आयुष्य सुखमय व सुलभ होण्याकरिता सन २०१३ मध्ये ज्येष्ठ नागरीक धोरणास मंजुरी देण्यात आली. अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक धोरण राबवणारी मुंबई महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरली आहे. त्यानुसार २८ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ज्येष्ठ नागरिकांनी मराठी व हिंदी गीत गायनाचा कार्यक्रम सादर करत स्वतःसह इतरांनाही भूतकाळात नेऊन सोडलं. विशेष म्हणजे यात सहभागी झालेले सर्व गायक तसेच वादक हे ज्येष्ठ नागरिक होते. आधाता ट्रस्ट या जेष्ठ नागरिक संघाच्या सभासदांनी दोन नृत्याविष्कार सादर केले.
ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता
मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष शरद डिचोलकर यांनी महानगरपालिकेकडे ज्येष्ठांच्या समस्या मांडून त्याचे निराकरण करण्याचे तसेच ९ वर्षांपूर्वी महापालिकेने सादर केलेल्या ज्येष्ठ नागरिक धोरणामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याची सूचना केली व त्यात सुधारणा करण्याचे आवाहन महापालिकेला केले, तसेच प्रत्येक विभागामधे जेष्ठ नागरिकांकरता हक्काचे विरंगुळा केंद्र , केअर सेंटर असावे अशीही विनंती केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य समाज विकास अधिकारी भास्कर जाधव, समाज विकास अधिकारी वेदिका पाटील, लोणे, नितीन घरत, रामजी पवार, सुनील कुलकर्णी व नियोजन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली होती.